Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उबाठा गटाचे ओमराजें निंबाळकर विरोधात महायुतीतून कोण लढणार? महायुतीसह मराठा समाजाच्या उमेदवाराची उत्सुकता शिगेला! महायुतीमध्ये जागा कुणाला; भाजप, शिवसेना शिंदे की राष्ट्रवादी अजित पवार?

काटी/उमाजी गायकवाड 
देशभर लोकसभा निवडणुकीची  धामधूम सुरु झाली आहे. महाविकास आघाडीत उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे असून उस्मानाबादचे  विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु  अद्यापपर्यंत महायुतीच्या उमेदवारी बाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा आणि त्यांचा उमेदवार कोण? यासह सकल मराठा समाजाचा उमेदवाराची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एकेकाळी कॉंग्रेसच्या अरविंद कांबळे यांना मुळचे उदगीरचे असूनही मतदारांनी त्यांना चारवेळा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं होतं. काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती सध्या बिकट झाल्याचे चित्र आहे. 1952 ते 1991 याकाळात झालेल्या नऊ लोकसभा निवडणुकांमध्ये धाराशिवच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं. याकाळात राघवेंद्र दिवाण,व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर, तुळशीराम पाटील,टी.एस. श्रंगारे,टी.एन. सावंत,अरविंद कांबळे यांनी उस्मानाबाद (धाराशिव )चे नेतृत्व केले होते. 1984 ते 2009 या 25 वर्षाच्या कालखंडात हा मतदारसंघ राखीव होता. या कालावधीत शिवसेनेचे शिवाजी कांबळे व कल्पनाताई नरहिरे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. 1996 साली शिवसेनेचे शिवाजी कांबळे विजयी झाल्यानंतर मात्र  हि मालिका खंडित झाली व त्यानंतर मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी उस्मानाबाद लोकसभेवर कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेनेने ताबा मिळवला आणि काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना सुमारे 25 वर्ष लोकसभेच्या गादीपासून दूरच ठेवले.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ तिर्थक्षेत्र तुळजापूरचे प्रसिद्ध  तुळजाभवानी  मंदिर, धाराशिवची लेणी, प्रख्यात राष्ट्रीय संत राहिलेल्या संत गोरोबा काका कुंभार यांचे तेर गाव, नळदुर्गचा किल्ला यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांचा वारसा लाभलेल्या या जिल्ह्याला राजकारणाचा सुध्दा वसा लाभलेला आहे. या जिल्ह्यात अनेक मातब्बर नेते घडवले आहेत. राज्यपातळीवरील राजकीय नेत्यांचे नातलगही याच मतदारसंघात आहेत. परंतु हे सगळे असले तरी सततचा दुष्काळ, राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, सरकारचं उदासीन धोरण, मतदारसंघातील राजकारण आणि उद्योगावर काही मोजक्या घराण्यांचं असलेलं नियंत्रण अशा विविध कारणांमुळे उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हा मात्र शिक्षण, विकास, रोजगार आणि उद्योगापासून  कोसो दूर राहिल्याने या जिल्ह्याची ओळख एक आकांक्षित जिल्हा म्हणूनच राहिली आहे.

2009 ला हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ खुला झाला आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या डॉ.पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी त्यांना आव्हान दिलं. महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांनी त्या निवडणुकीत 6,787 मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी या पराभवाची परतफेड करत पद्मसिंह पाटील यांचा 2,35,325 मतांनी पराभव केला. त्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट पाहायला मिळाली होती आणि त्या लाटेवर स्वार होत रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. त्यावेळी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देणारी निवडणूक म्हणून 2014 च्या निवडणुकीकडे पाहिलं गेलं.

2019 मध्ये मात्र शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापले गेले आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे कौटुंबिक विरोधक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या अविस्मरणीय झालेल्या  लढतीत ओमराजे निंबाळकर यांनी 1,27,566 मतांनी विजय मिळवला.

त्यानंतर 2019 ते 2024 या कालावधीत जिल्ह्याच्या राजकारणात फारसा प्रभाव नसलेल्या भाजपाने राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे नातलग राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना तुळजापूर विधानसभेचे आमदार केले. तेव्हापासून जिल्ह्यात भाजपचे प्रस्थ वाढायला सुरुवात झाली.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

सद्यस्थितीत धाराशिव लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ यापैकी औसा आणि तुळजापूर हे भाजपकडे, उमरगा आणि परांडा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि उस्मानाबाद विधानसभा ही उद्धव ठाकरे गटाकडे आहे. तर बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता.
थोडक्यात महायुतीकडे सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिलेल्या कैलास पाटील यांच्या रुपाने मविआचा एक  आमदार व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दोघेजण मात्र ठाकरे गटातच राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपने बसवराज पाटील यांच्या रुपाने काँग्रेसच्या नेत्याला आपल्या गोटात घेण्यात यश मिळवलं आहे.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेच्या निवडणूकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून पुन्हा  एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर या उमेदवारी जाहीर झाल्याने जिल्ह्यातील मातब्बरांची टीम एका बाजूला असलेल्या महायुतीचा उमेदवारीबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. इच्छुकांची यादी जरी जास्त असली तरी हि जागा भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट कि शिंदे गटाला सुटणार यावर पुढची गणिते अवलंबून असणार आहेत.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेसाठी महायुतीमधून भाजपकडून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील,काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील, छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आणि माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, राष्ट्रवादी अजित पवार गटातून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार तर शिवसेना शिंदे गटातून पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आदी मातब्बरांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये पाच जागा  मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात असून या जागांपैकी धाराशिव ही महत्त्वाच्या जागेचाही समावेश होऊ शकतो.  गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणार कोण उतरणार? याची चाचपणी सुरू आहे. यामध्ये भाजपकडून इच्छुक असलेल्या माजी सनदी  अधिकारी प्रवीण परदेशी यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जिल्ह्यात दौरे सुरु केले  असले तरी जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार किंवा माजी सनदी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांना  घड्याळ चिन्हावर उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 

उध्दव ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देणारा महायुतीचा तुल्यबळ उमेदवार कोण असेल, सकल मराठा समाजाचा उमेदवार कोण असणार? या बाबत मात्र जिल्ह्यातील मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाच वर्षे खासदार म्हणून काम केलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत सामान्य मतदारांना काय वाटतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकापेक्षा एक तगडे राजकीय नेते पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाणारा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी किती प्रभावी ठरतात यावरच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे. 

महायुतीतून अनेकजण इच्छूक असले तरी उमेदवारी कोणाला  मिळणार? सकल मराठा  समाजाचा उमेदवार कोण असणार ? आणि धाराशिवचा गड कोण जिंकणार ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

                                 (संग्रहित छायाचित्र )

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर 
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments