तुळजापूर:- तालुक्यातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आरळी बुद्रुक गावातील प्रगतशील शेतकरी विरनाथ बचाटे यांचे सुपुत्र संदीप बचाटे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण होत गावातुन पहिला फौजदार होण्याचा मान मिळवल्याने मिरवणूक काढुन सन्मान सत्कार करण्यात आला.
आरळी बुद्रुक गावातील तरुणाई सातत्याने आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. क्षेत्र कोणतेही असो आपला ठसा उमटवत गावचे नाव रोशन करतात. असाच एक तरुण संदीप विरनाथ बचाटे यांनी पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची सातत्यपूर्ण तयारी केली आणि तब्बल पाच वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेत यश प्राप्त केले आहे. निकालानंतर गावात आगमन होताच डॉल्बीच्या ठेक्यावर आणि फटाक्यांची आतिषबाजीसह मित्र परिवार, गामस्थ आणि आप्तेष्टांकडून स्वागत सत्कार करत संदीपचे कौतुक करण्यात आले.
प्रगतशील शेतकरी असणारे विरनाथ बचाटे,आई जगदेवी बचाटे आणि बंधू नागनाथ बचाटे यांनी संदिपच्या शैक्षणिक प्रवासात खूप कष्ट घेत सकारात्मक साथ दिली. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत भविष्य अजमावण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात अभ्यास करत असताना अनेक चढ उतार येत असतात त्यामुळे पालकांच्या कष्टाची जाणीव मनी ठेवत यशाला गवसणी घालावी लागते असे मत संदीप बचाटे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
0 Comments