मुरुम/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ शकत नाही हा दृष्टिकोन सतत डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्रात अविरत कार्य करणारे दिवंगत सिद्राम गंगाराम शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ बुधवारी (ता. १९) रोजी उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिंदे परिवाराकडून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. रायप्पा कटके होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, धम्मचारी धम्मभूषण राम कांबळे, मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे, मंकावती कांबळे, गंगाधर शिंदे, प्रा. रुक्मिणी शिंदे, बळीराम शिंदे, सीए शिवराज मिटकरी, हिमाचल प्रदेश येथे केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय विभागात टेक्स्टाईल इंजिनियर तथा मुरूमचे सुपुत्र शिवाजी शिंदे, माजी सुभेदार मेजर विजयकुमार शिंदे, रूपाली शिंदे, मंगल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहरातील विविध शाळांमधील ७५ पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मानचिन्ह, शैक्षणिक साहित्य देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिंदे कुटुंबीयांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे यांच्याकडे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी दोन सायकली भेट म्हणून देण्यात आल्या.
याप्रसंगी गंगाधर शिंदे, प्रा. रुक्मिणी शिंदे, प्रमिला तुपेरे, बळीराम शिंदे, मंकावती कांबळे, विजयकुमार देशमाने, प्रा. डॉ. महेश मोटे आदींनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे आपापल्या शाळेची उंची वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून कौतुक केले. आई-वडील, गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. विमान जसं वरती जातं तसंच ते परत खालीही येतं. त्यामुळे पाय जमिनीवर राहातील याचे भान ठेवा. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे अमिषांपासून, व्यसनांपासून दूर राहा. तुमचे वय स्वप्न बघण्याचे आहे, पण अशीच स्वप्न बघा जी झोपू देत नाहीत. आपले आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तब्ब्येत कमवा. ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा. आम्हाला तुमचा अभिमान आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडील व गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. कटके म्हणाले की, माणसाने नेहमी एखाद्याच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा देण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक एकाच छताखाली आज या कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आले आहेत. हा एक अद्भुत अनुभव आहे. अशा कार्यक्रमांमुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी शिंदे व त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक असणाऱ्या शिवाजी शिंदे व सौ. रुपाली शिंदे यांचा डॉ. खाजालाल ढोबळे यांनी विशेष सत्कार केला. याप्रसंगी शहरातील विविध दैनिकांच्या प्रतिनिधींचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाकरिता ऐश्वर्या शिंदे, सचिन शिंदे, ज्योतीराम शिंदे, वसंत शिंदे, धनराज शिंदे, तुकाराम शिंदे, गिरजप्पा कावळे, रेवण कटके, राजु कटके, अंबादास शिंदे, प्रवीण शिंदे, धोंडीबा शिंदे, जयश्री कांबळे, रेश्मा शिंदे, वैभव कटके आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अजिंक्य मुरूमकर तर आभार तात्याराव शिंदे यांनी मानले. यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मुरूम, ता. उमरगा येथे शिंदे कुटुंबियांकडून गुणवंत समारंभाप्रसंगी जिल्हा परिषद कन्या शाळेस सायकल भेट देताना मान्यवरांसोबत मुख्याध्यापिका व अन्य.
0 Comments