Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडी येथील 367 एकरावरील नवीन एमआयडीसीसाठी शासनाकडून हिरवा कंदील; आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत येथील एमआयडीसीमध्ये 130 उद्योजकांची गुंतवणूक करण्याची तयारी

काटी/उमाजी गायकवाड
माजी उद्योग व कृषी राज्यमंत्री तथा तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरील तामलवाडी येथे 367 एकरावर नवीन एमआयडीसीसाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला असून, पुढील कार्यारंभासाठी सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांची आज (दि. 14) हॉटेल सिटी पार्क येथे आ. पाटील यांनी एक बैठक घेवून या एमआयडीसीबाबत उद्योजकांची मते जाणून घेतली. या बैठकीस सोलापूर शहर-जिल्ह्यातील शेकडो उद्योजक उपस्थित होते.

गेल्या 2 ते 3 वर्षांपासून तामलवाडी येथे एमआयडीसी होणार-होणार असा विषय चर्चिला जात होता. येथील उद्योजक किशोर कटारे यांनीही या एमआयडीसीसाठी सतत पाठपुरावा केला होता. मात्र परवाच्या पावसाळी अधिवेशनात तामलवाडी येथे 367 एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पर्यटनासह उद्योगांच्या माध्यमातून 10 हजार रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी आ. पाटील यांनी ही नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना दिल्या होत्या. सोलापूरपासून नजीक व राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण तसेच अल्पावधीतच होणारा रेल्वे मार्ग, अशा दळणवळणाच्या भक्कम जाळ्यामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना आता मोठा वाव मिळत आहे. आ. पाटील यांच्या मागणीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तामलवाडीला नवीन एमआयडीसी मंजूर केली आहे. यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे.

 धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. या अनुषंगाने सोलापूर येथील उद्योजकांची आ. पाटील यांनी मते जाणून घेतली. या बैठकीत अनेक उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली आहे. फक्त पाणी आणि वीज कमी दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ. पाटील यांच्याकडे केली. तर या ठिकाणी टेक्सटाईल, गारमेंट, फूडपार्क, सोलार, कोल्ड स्टोअरेज, बेदाना प्रकल्प, शासकीय-निमशासकीय युनिफॉर्म बनविणे आदींवर विस्तारित चर्चा झाली. येथील 367 एकर जमिनीपैकी 75 एकर टेक्सटाईल पार्क, 75 एकर गारमेंट, फूड प्रोडक्टसाठी 50 एकर अशी 200 एकर जमीन देण्यात येणार असून, उर्वरित जमीन इतर उद्योजकांना देण्यात येणार आहे. या बैठकीस लातूर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भांबरे, भूमापक बालाजी निलेवार यांचीही उपस्थिती होती.

उद्योजक बांधवांना सर्व सोयी-सुविधा देणार: आ. राणाजगजितसिंह पाटील

सोलापूर आणि तामलवाडी पंचक्रोशीतून बैठकीसाठी आलेल्या सर्व उद्योजकांना कमी दरात जमीन, पाणी आणि वीज देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. इतकेच नाहीतर सुंदर अशा एमआयडीसीची या ठिकाणी उभारणी करायची असून, किमान 10 हजार जणांना शाश्‍वत रोजगार मिळावा, अशी अपेक्षा आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. उद्योजकांनीही मोठा प्रतिसाद दिल्याने तामलवाडी येथे एमआयडीसी अल्पावधीतच साकारणार असून, जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल, अशी आशा आ. पाटील यांनी व्यक्त केली.

एमआयडीसी लवकर चालू करा: महेश गादेकर

गेल्या काही वर्षांपासून तामलवाडी येथील औद्योगिक वसाहतींसाठी आ.राणाजगजितसिंह पाटील पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला आता यश आले आहे. पहिल्या उद्योजकांच्या बैठकीत आ. पाटील यांनी इच्छुक उद्योजकांना सर्व सुविधा देण्याचे मान्य केले आहे. येत्या पंधरवड्यात विविध खात्याच्या अधिकार्‍यांबरोबर आ. पाटील यांनी या उद्योजकांची पुन्हा एक बैठक घेवून तामलवाडी एमआयडीसीच्या कामाला गती आणावी. तसेच ही एमआयडीसी लवकर उभारावी व बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून द्यावा.
महेश गादेकर, राष्ट्रवादी नेते, सोलापूर

Post a Comment

0 Comments