मुरूम/प्रतिनिधी
भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते. या काळात उपोसथ विधी 'अशुद्ध मनाची शुद्धता ' करण्याचा हा काळ आहे. बौद्ध धम्मामध्ये गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी तथागतांच्या जीवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहेत. मानवाला धम्म उपदेश करून कुशल मार्गावरती आरुढ केले, असे प्रतिपादन त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी धम्मभूषण राम कांबळे यांनी केले. कांबळे परिवाराच्या वतीने सिद्धार्थ कॉलनी येथे आयोजित वर्षावास, गुरुपौर्णिमा, धम्मचक्क प्रवर्तन दिन आषाढ पौर्णिमा निमित्ताने गाथापठन व धम्मदेसना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रविवारी (ता. २१) रोजी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अधिक्षक मिलिंद कांबळे होते. यावेळी शिवाजी गायकवाड, अमर कांबळे, सरकार भिमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कांबळे, अभिजीत कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. धम्मभूषण म्हणाले की, राजा शुद्धोधन राणी महामाया यांच्या राज्यांमध्ये प्रत्येक पौर्णिमेला अतिशय सुंदर असा महोत्सव साजरा केला जात असे. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी असाच उत्सव साजरा करून महामाया आपल्या महालामध्ये आराम करत असताना त्यांच्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा बोधिसत्व हत्ती येऊन हे माते या पृथ्वीतलावरील माझा शेवटचा जन्म आहे आणि तो जन्म मला तुझ्या पोटी जन्म घ्यावा वाटते. अशा प्रकारची विनंती करतो महामायाला जाग आल्यानंतर या स्वप्नांचा उलगडा करण्यासाठी महाराजांना सांगते. याच दिवशी महामायांना गर्भधारणा होते. ती घटना याच आषाढ पौर्णिमा दिवशी होऊन सुंदर असा राजकुमार जन्माला आला. सिद्धार्थ गौतम रोहिणी नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून आपल्याच नात्यांमध्ये युद्ध करणे, संघर्ष करणे हे न पटल्यामुळे त्यांनी अशा ह्या परंपरेविरुद्ध आणि मनुष्याच्या दुःखाचा शोध घेणे कामी सर्व सुखाचा, सुख वैभवाचा त्याग करून दुःख निवारणाच्या शोधासाठी घराबाहेर पडले म्हणजेच महाभिनिष्क्रमण म्हणून संबोधले जाते. याच उदात्त विचाराने प्रेरित होऊन सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. तो याच आषाढ पौर्णिमा दिवशी. सिद्धार्थ गौतमाने सहा वर्ष अनेक प्रकारच्या खडतर तपश्चर्या करून बुद्धत्वाची प्राप्ती केली. चार आर्य सत्याचा शोध मानवाच्या कल्याणासाठी दुःखमुक्त करण्याकरिता पहिला धम्म उपदेश पंचवर्गीय भिक्षू कौडिण्य, महानाम, वप्प, अश्वजीत व भद्दीय यांना सांगून पहिले धम्मचक्र प्रवर्तन संपन्न केले. तो याच आषाढ पौर्णिमा दिवशी. प्रारंभी दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. अमर कांबळे, गौरव कांबळे, ज्योती मुरुमकर, सुजाता कांबळे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी सुप्रिया कांबळे, रसवंती कांबळे, अनुराधा गायकवाड, ईच्छा गायकवाड, किर्ती कांबळे, कमल कांबळे, अभिजीत गायकवाड आदींसह बहुसंख्येने धम्म बंधू-भगिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक सुनिता कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन अजिंक्य मुरुमकर तर आभार अमर कांबळे यांनी मानले.
सिद्धार्थ कॉलनी, मुरूम, ता. उमरगा येथे कांबळे परिवाराच्या वतीने आयोजित वर्षावास निमित्ताने गाथापठन व धम्मदेसना प्रसंगी राम कांबळे व अन्य.
0 Comments