Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अर्ध्यावरती डाव मोडला... अधुरी एक कहाणी.....चौघा बंधुप्रेमातील संजय (भैय्या) देशमुखची एक्झिट; मनाला चटका लावून गेलास मित्रा संजू ...

                      --कै. संजय बाजीराव देशमुख,

काटी/उमाजी गायकवाड 
प्रतिकुल परिसरातवर मात करीत देशमुख  बंधूंनी उद्योग क्षेत्रात भरारी घेत आता कुठे वैभव प्राप्त केले होते.अजय देशमुख, अमरसिंह देशमुख, विजयसिंह देशमुख व धाकटे बंधू संजय (भैय्या) देशमुख या चारही भावांमध्ये अतूट प्रेम, जिव्हाळ्याचे नाते, एकमेकांना आयुष्यभर साथ देणारे भाऊ परंतु यातील सर्वात लहान बंधू संजय देशमुख ऐन गणेश विसर्जन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी मंगळवार दि.17 रोजी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि मन अक्षरशः सुन्न झाले. 

अर्ध्यावरती मोडलेल्या डावाची ही अधुरी कहाणी लिहायला मनच धजावत नाही..या कहाणीची सुरुवात कुठून करायची..... आणि शेवट कसा करायचा... अक्षरशः मन सुन्न झालंय. खरं तर संंजू माझा लहानपणापासून जिगरबाज व जीवलग मित्र तो गावाकडे यायला की चेष्टेने हसत हसतच कुठाय रे आंधळ्या तू मी गावाकडे यायलो  म्हणून फोन ठरलेला असायचा. त्याच्या मृत्यूची बातमी मनाला अतिशय चटका लावून गेली. माझी जर ही अवस्था असेल तर जेव्हा तुमचे अवघे आकाश तुमच्याकडून हिरावून घेतले असेल तर एकमेकांवर अतिशय प्रेम करणाऱ्या अजू दादा,अमरसिंह , विजयसिंह या देशमुख बंधूंची, त्याच्या आई विजयादेवी,पत्नी अश्विनी व मुलगी ईश्वरी बाळाची, त्याचे पुतणे अभय,गजू व अमित    सन ग्रुप त्याचे विश्वासू नवनाथ ढगे यांच्यासह त्यांच्या कामगारांच्या मनाची स्थिती काय झाली असेल कल्पनाच करु शकत नाही.धाराशिव  जिल्ह्यासह अख्खं गाव हळहळले, निशब्द झाले होते. संजू भैय्याच्या जाण्याने कुटुंबावर आलेले संकट, कुटुंब, नातेवाईक,मित्रांचा आक्रोश आणि कामगारांनी फोडलेला हंबरडा पाहून सर्वांचे मन हेलावून गेले होते. सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

                   !!भावपूर्ण श्रद्धांजली!!
              कै. संजय बाजीराव देशमुख काटी 

या चारही भावांनी आपला बंधूभाव जपला. चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा. प्रत्येकांनी व्यवसाय सांभाळत असताना एकत्र कुटुंबाची नाळ कधीही तुटू दिली नाही. संजूचा सर्व घराला आधार होता.त्याला विचारल्याशिवाय काडीही हालत नव्हती. कुटुंबाला एकत्रित ठेवण्यात आपला खुप मोठा वाटा होता. कुटुंबासह मित्र प्रेम, गावाशी असलेली नाळ आपण कधी तुटू दिली नाही. निमंत्रण मिळाले की कायम त्या कार्यक्रमाला हजर असायचाच. 

संजू  स्पष्ट,निर्भिड व सडेतोड  त्याच बरोबर प्रेमळ व्यक्तिमत्त्व सर्वांना परिचित असल्याने प्रत्येकाशी त्याचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. 

एखाद्याला आपल्या बोलण्यामुळे राग आला तर लगेच त्याला कुरवाळून जवळ घ्यायचाच. कामगारांना काही बोलला तर लगेच प्रेमाणे म्हणत होता 'बोलावे लागते रे' म्हणून परत जवळीक साधायचा. त्यामुळे तर आपले कामगार मुख्य आधार गेल्याने ओक्साबोक्शी रडत होते. त्यांना हुंदका आवरत नव्हता. हे दृश्य पाहून हृदय पिळवटून जात होते. परंतु नियतीला हे पसंत नव्हते असेच म्हणावे लागेल.आता त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून जिल्हाभरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.आणि अचानक संजूने या तिघा भावाची साथ सोडून अचानकपणे जीवनातून एक्झिट केली. त्याचा मृत्यू झाला यावर खरं विश्वासात बसत नाही. आजही वाटत संजू भैय्या आपल्यातच आहे. संजू भैय्याच्या अंत्यविधीला झालेली गर्दी पाहून त्याने किती माणसे कमावली असं प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहत नाही.

धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यच्या सिमेवरील तुळजापूर तालुक्यातील काटी येथील देशमुख बंधूनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उद्योक क्षेत्रात आपला ठसा उमटवत धाराशिव जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण करून मराठी माणूस देखील चांगला उद्योजक बनू शकतो, हे सिद्ध करून दाखवले. तसा काटी येथे शेती करीत असलेले त्यांचे थोरले बंधू अजयसिंह बाजीराव देशमुख, उद्योजक अमरसिंह देशमुख, विजयसिंह देशमुख व संजय देशमुख या भावंडांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने थक्क करणारा आहे. 

तुळजापूर तालुक्यातील निजाम राजवटीपासून काटी या गावची ओळख तशी वतनदारांचे गाव म्हणूनच ओळखले जाते. याच देशमुख  वतनदार घराण्यातील कै.बाजीराव व्यंकटराव देशमुख यांचा शेतीसोबतच विहिरीवरील इंजिन दुरुस्तीमध्ये सुध्दा हातखंडा होता. परंतु कालांतराने नैसर्गिक आपत्ती व कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे त्यांना 60 एकरपैकी 38 एकर शेती विकण्याची वेळ आली. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतीच्या उत्पादनात मोठी घट झाली.मोठा परिवार असल्याने दिवसेंदिवस आर्थिक चणचण भासू लागली. घरात अठराविश्व दारिद्र्य निर्माण झाले.थोरले बंधू अजयसिंह देशमुख  हे शेती पाहत होते. काही काळ तर त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात काम केले होते. शेती करीत असताना 
शेतात उत्पन्न निघत नव्हते. 

कुटुंबातील लहान असलेले अमरसिंह व संजय यांना काय करावे काहीच सुचत नव्हते. दहावीची परीक्षा दिल्यानंतर लगेच अमरसिंह देशमुख व विजयसिंह या बंधूंनी धाकटे बंधू संजय यास घेऊन पुणे गाठले. पुणे येथे पडेल ते काम करीत हालअपेष्टा सहन केल्या. संजयने  स्प्रे पेंटींग दुकानात काम करीत होता. तर विजयसिंह देशमुख हे पुण्यात इलेक्ट्रिक दुकानात कामाला होते आणि अमरसिंह यांनी पुण्यात यश एंटरप्राईजेस मध्ये अवघ्या 150 रुपये महीना पगारावर काम केले. या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. पुण्यात काम करत असताना आपण नौकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचे व आपणही उद्योजक बनायचे असा विचार यायचा मात्र घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे लगेच व्यवसाय करणे शक्य नव्हते. परंतु म्हणतात ना मानसाच्या मनात जिद्द व परिश्रम घेण्याची उर्मी असली की, कोणतीही गोष्ट साध्य करता येते. याची प्रचिती पुण्याहून धाराशिव मध्ये येऊन देशमुख बंधूनी सन ग्रुपच्या  माध्यमातून दिली.

दिवसेंदिवस उद्योग व्यवसाय वाढत असल्याने सनग्रृपच्या नावाखाली सन ॲल्युमिनियम, सन सिरॅमिक,सन प्लाय,सन ग्लास व हार्डवेअर,सन पेंट,सन बिल्डींग मटेरियल्स,सन लाईट हाऊस,नुकताच सुरु करण्यात आलेले जागतिक पातळीवरील  जॅग्वार शो रुम अशा शाखा उभा केल्या. विविध शाखांच्या माध्यमातून बारमाही दिडशे लोकांना रोजगार मिळवून दिला. एकेकाळी दुसऱ्यांच्या व्यवसायात काम करणारे देशमुख बंधूनी काटी सारख्या ग्रामीण भागातून जावून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून धाराशिव सारख्या जिल्ह्यच्या ठिकाणी स्वत:चा उद्योग व्यवसायात जम बसवून इतरांच्या रोजगाराचा प्रश्न मिटविला.

गरीबीची जाणीव असल्याने सहाजिकच त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या जन्मभूमीतील असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. सामाजिक कार्यातून संजय देशमुख याने पंचायत समितीची निवडणूक लढवून त्याने 2013 ते 2017 पर्यंत पंचायत समिती सदस्यपद दिमाखात भुषविले होते. रुबाबदार व स्वाभिमानी चेहरा व संघर्षमय प्रवास आठवला की आजही मनाला वेदना होतात.

डाव कुठं आता रंगात आला होता. परंतु दोन वर्षांपासून त्यास यकृताच्या आजाराने गाठले व याच यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या संजू भैय्याने कधीच आपल्या चेहऱ्यावर त्रास होत असल्याचे भासवू दिले नाही. नेहमी प्रसन्न  व रुबाबदार चेहरा असायचा त्याला पाहून असे वाटायचे की त्यास कुठलाही आजार नसावा. प्रकृती विषयी विचारले तर आता व्यवस्थित आहे एवढं बोलून समोरच्याना वाटणारी काळजी दूर करायचा. आता कुठं सुखाचे दिवस पाहत असतानाच अचानक मंगळवारी संजूला मृत्यूने गाठले व या जगातून एक्झिट केली. 

"भातुकलीच्या  खेळा मधली राजा आणिक राणी.... अर्ध्यावरती डाव मोडला...अधुरी ही कहाणी" या मराठी भाव गीता प्रमाणे संजू भैय्या गेल्याने भातुकलीच्या  खेळामधील डावाप्रमाणे संसाराचा डाव अर्ध्यावरती  मोडून पडल्याची जाणीव होत आहे. 

काळ जर थांबविता आला असता तर माझा मित्र संंजू भैय्या अजुनही रहायला नक्की आवडले असते.

संजू भैय्या तुझ्या आत्म्यास शांती लाभावी व तुझ्या कुटुंबियांवर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ते दु:ख झेलण्याची ताकद त्यांना देवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
              तुझाच मित्र
        उमाजी गायकवाड
                काटी

Post a Comment

0 Comments