काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक विजयकुमार गायकवाड यांची काटगावला तर सहशिक्षिका श्रीमती वासंती उमाजी गायकवाड यांची मैलारपूर मुर्टा तांडा या ठिकाणी बदली झाल्याबद्दल शनिवार दि.4 सप्टेंबर रोजी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्काराने निरोप दिला.तर इतर ठिकाणावरून शाळेत दाखल झालेल्या बालाजी दंडनाईक व श्रीमती मनिषा जाधव या शिक्षक दाम्पत्यांसह संजय वाले यांचे स्वागत केले.
प्रारंभी सरपंच वर्षाराणी वडणे,केंद्र प्रमुख संजय वाले,पोलीस पाटील विठ्ठल वडणे,मुख्याध्यापक इर्शाद शेख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थी व बदली झालेल्या विजयकुमार गायकवाड व श्रीमती वासंती गायकवाड या शिक्षकांना शाळेतील आठवणींना उजाळा देतांना गहिवरून आले.श्रीमती वासंती गायकवाड यांनी 2001 पासून वस्तीशाळेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास व 2017 पासून कुंभारीतील ग्रामस्थांचे सहकार्य व विद्यार्थांनी केलेले प्रेम हे सांगताना त्या स्वतः भावूक झाल्या. दोन्ही शिक्षकांनी व्यक्त केलेल्या भावनेतून शाळेविषयीचे त्यांचे प्रेम, विद्यार्थ्यांविषयीची तळमळ त्यांच्या शब्दांतून प्रकर्षाने जाणवत होती.इंग्लिश व खाजगी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थांना याच जिल्हा परिषदेच्या शाळेत रोखण्यात यश मिळवल्याने शाळेची विद्यार्थी संख्याही वाढल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जड अंतकरणाने विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपल्या भावना व्यक्त करीत या दोन्ही शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून भेटवस्तू दिल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील विठ्ठल वडणे यांनी शिक्षकांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण झाली. शिक्षकांनी समर्पित भावनेने कर्तव्य बजावल्याचा गावातील विद्यार्थ्यांना फायदा झालेला असून विद्यार्थांनीही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानार्जन करावे तसेच नवागत शिक्षकांनीही त्यांच्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यापुढेही शाळेच्या विकासाठी सर्व ग्रामस्थ निश्चितपणे प्रयत्न करतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा परिषद शाळेतच गुणवत्तापुर्ण शिक्षण
--केंद्रप्रमुख संजय वाले
सध्या अनेक पालक खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळांकडे वळत आहेत. केवळ फी कमी असण्यामुळे नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण,तंत्रज्ञान साक्षरता आणि विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांची तळमळ यामुळे जिल्हा परिषद शाळा अधिक विश्वसनीय बनल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत सरकारच्या माध्यमातून ‘मध्यान्ह भोजन योजना’, ‘मोफत पाठ्यपुस्तके’, ‘गणवेश योजना ,विविध शिष्यवृत्ती योजना, आदी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुध्दा जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी राज्यस्तरावर चमकत असल्याचे मत व्यक्त करुन यापुढेही कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्र प्रमुख संजय वाले यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.
सुञसंचलन व आभार
या कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचलन सातवीतील विद्यार्थ्यांनी जिया पठाण व संध्या वडणे यांनी केले.तर आभार व्यक्त करताना सहशिक्षक विजयकुमार गायकवाड व सहशिक्षिका श्रीमती वासंती गायकवाड यांनी शाळेसाठी दिलेले योगदान आमच्या हृदयात कायम स्मरणात राहील,अशी भावना मुख्याध्यापक इर्शाद शेख यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी सरपंच सौ.वर्षाराणी संतोष वडणे, पोलीस पाटील विठ्ठल वडणे,केंद्र प्रमुख संजय वाले,
सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव स्वामी,मुख्याध्यापक इर्शाद शेख, संतोष वडणे,पंडित वडणे,अविनाश इंगळे,विष्णू वडणे,आयाज शेख,सहशिक्षक पोपट सुरवसे,विठ्ठल गावित, सुप्रिया स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments