काटी/उमाजी गायकवाड
शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित, वडगाव (काटी) येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आयुष्यात निश्चित ध्येय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध आंधळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे उपस्थित होते. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, उपाध्यक्ष संतोष कोळी, वि. का. सो. माजी व्हाईस चेअरमन उमेश कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक सचिव कै. सि. ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि 'खरा तो एकची धर्म' या सामुदायिक प्रार्थनेने झाली. यावेळी विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुणे भैरवनाथ कानडे सरांचा विशेष सत्कार करण्यात आला. निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, तर निरोप देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
आदर्श शिक्षक भैरवनाथ कानडे यांचे मोलाचे विचार:
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदर्श शिक्षक भैरवनाथ कानडे म्हणाले की,जोपर्यंत तुम्ही निश्चित ध्येय ठरवत नाही,तोपर्यंत तुम्ही तुमचे सर्वोत्तम साध्य करू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याकडे जिद्द,जिज्ञासा, जाणीव आणि जागृती हे गुण असायला हवेत. सतत चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवण्याचे आवाहन केले.ते पुढे बोलताना म्हणाले केवळ पुस्तकं वाचून चालणार नाही,तर मिळवलेल्या ज्ञानाचा वापर परिस्थितीनुसार करता आला पाहिजे. व्यवहारात उत्तम राहून सातत्याने प्रगतीकडे झेप घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचा समारोप:
कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक आंधळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण गुरव यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments