Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सुरवंटाचे झाले पाखरु...'; चव्हाणवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत साठले आठवणींचे काहूर!स्वयंशासन दिनानिमित्त इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी जपली गुरुप्रती कृतज्ञता; शाळेला दिली 'डायस'ची भेट

'

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी/उमाजी गायकवाड
 "सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या आमच्या शाळा आणि गुरुजनांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाहीत. आज काही तास शिक्षक होऊन पाहिल्यावर त्यांच्या कष्टाची खऱ्या अर्थाने जाणीव झाली," अशा उत्कट भावना संजना चव्हाण या विद्यार्थिनीने व्यक्त केल्या. निमित्त होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवाडी येथील 'स्वयंशासन' दिनाचे.

गेल्या आठ वर्षांपासून ज्या शाळेने संस्कारांचे बाळकडू दिले, त्या शाळेतून निरोप घेताना इयत्ता आठवीच्या १६ विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता व्यक्त केली. तंत्रज्ञानाच्या युगातही गुरु-शिष्य परंपरेची संस्कृती या विद्यार्थ्यांनी जोपासल्याचे यावेळी दिसून आले.

बालशिक्षकांनी अनुभवले अध्यापनाचे कौशल्य
या दिवशी शाळेतील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी साडेतीन तास १ ली ते ७ वीच्या वर्गांना अध्यापन केले. केवळ ज्ञानदानच नव्हे, तर प्रशासकीय कामकाज, शिस्त, वक्तशीरपणा, अचूक नियोजन आणि सांघिक वृत्ती यांसारख्या जीवनकौशल्यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. ताणतणाव व्यवस्थापन आणि चिकीत्सक विचार करण्याची नवी दृष्टी या उपक्रमातून मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.

एक आगळीवेगळी भेट
शाळेप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक 'डायस' (भाषण मंच) भेट म्हणून दिला. तसेच, शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी सर्व मित्रांसाठी 'दालचा-राईस आणि जिलेबी' अशा स्वादिष्ट अल्पोपहाराचे आयोजन केले होते, ज्यामुळे या कार्यक्रमाची गोडी अधिकच वाढली.

यांनी सांभाळली धुरा
स्वयंशासन दिनाचे 'बालमुख्याध्यापक' म्हणून समर्थ सुरडे तर 'उपमुख्याध्यापिका' म्हणून संजना चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच छात्राध्यापक म्हणून उर्मिला चव्हाण, जिजाबाई चव्हाण, मुक्ता चव्हाण, किशोरी नवगिरे, शुभेच्छा चव्हाण, समर्थ चव्हाण, ओम चव्हाण, प्रांजल चव्हाण, विजय चव्हाण, हरी चव्हाण, सार्थक नवगिरे, संग्राम पारधे आणि आदर्श चव्हाण यांनी विविध विषयांचे अध्यापन केले.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन गायकवाड, हनुमंत डोलारे, विकास ढंगे, शांताराम कुंभार, श्रीमती सुवर्णा काळे व दिपाली व्होटे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

0 Comments