Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव | उमाजी गायकवाड
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चुरशीची ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अखेर 'निकाल' लागला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करत महायुतीने धाराशिव जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्रखर नेत्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या (शिंदे गट) उषा रविंद्र गायकवाड यांची निवड जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवड प्रक्रियेत नव्या नेतृत्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात प्रशासनाच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
निवड प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी मतदान करून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आपली पसंती नोंदवली. त्यानंतर मतमोजणी पूर्ण होताच निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला.
या निवडीमुळे महायुतीतील सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व कायम राहिले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे जिल्ह्यातील राजकीय कसब पुन्हा एकदा समोर आले असून त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्ता टिकवून ठेवली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर महायुतीतील समन्वयानंतर अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अर्चनाताई पाटील यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदाची घोषणा होताच जिल्हा परिषद परिसरात कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत तसेच एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. अर्चनाताई पाटील आणि उषाताई गायकवाड यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात धाराशिव जिल्ह्याच्या विकासाकामांना गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
या निवड प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद सदस्य, प्रशासनातील अधिकारी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments