तुळजापूर | 'Only न्यूज धाराशिव'' वृत्तसेवा
आजच्या वैज्ञानिक युगातही ग्रहण काळातील अनेक भ्रामक समजुती समाजात घट्ट पाय रोवून आहेत. विशेषतः गर्भवती महिलांना या काळात अनेक जाचक नियम पाळण्याची सक्ती केली जाते. मात्र, सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) 'सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण' या उपक्रमांतर्गत एका गर्भवती मातेने या सर्व जुनाट समजुतींना छेद देत नवा आदर्श घालून दिला आहे.
नेमकी घटना काय?
'ग्रहण काळात भाजी चिरली किंवा कात्रीने काही कापले तर बाळाचे ओठ फाटतात', अशी भीती समाजात घातली जाते. या अंधश्रद्धेला कडाडून विरोध करण्यासाठी सौ. चांदणी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने आज चंद्रग्रहणाच्या काळात स्वतः भाजी चिरली, कात्रीने कागद कापले आणि अन्नग्रहणही केले. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला त्यांनी आपल्या धाडसी कृतीने चोख प्रत्युत्तर दिले.
विज्ञानाची साथ आणि कुटुंबाचा पाठिंबा
दुपारी ३ वाजता ग्रहणाचा वेध सुरू झाल्यावर सौ. चांदणी यांनी विविध भाज्या चिरून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार जपला. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या,"माझ्या होणाऱ्या बाळावर कोणत्याही अंधश्रद्धेचा नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावा, यासाठी मी हे पाऊल उचलले आहे. माझे माहेरचे आणि सासरचे कुटुंबीय पुरोगामी व विज्ञानवादी असल्यामुळेच मी हे धाडस करू शकले."सौ. चांदणी या अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्या वहिनी आहेत.
तज्ज्ञांचे मत: ओठ फाटण्यामागे शास्त्रीय कारणे
यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे यांनी स्पष्ट केले की,बाळाचे ओठ फाटणे हे केवळ जनुकीय कारणांमुळे किंवा गर्भावस्थेतील पोषणाच्या अभावामुळे होते.याचा ग्रहणाशी किंवा भाजी चिरण्याशी कोणताही संबंध नाही.
अंनिसच्या कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे यांनी सांगितले की, अशा अफवांमुळे गर्भवती महिला विनाकारण मानसिक तणावाखाली येतात, जे बाळाच्या आरोग्यासाठी अधिक घातक ठरू शकते.
अंनिसकडून उपक्रमाचे कौतुक
अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी स्पष्ट केले की, ग्रहण ही केवळ सावल्यांचा खेळ असलेली खगोलीय घटना आहे. या उपक्रमात धाडसाने सहभागी झालेल्या सौ. चांदणी थोरात यांचे अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर आणि अण्णा कडलास्कर यांनी अभिनंदन केले आहे.
अशाच धाडसी आणि सत्य घटनांच्या बातम्यांसाठी वाचत राहा - 'Only न्युज धाराशिव
0 Comments