"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील एका सामान्य शेतमजुराच्या कन्येने गरिबीवर मात करत पोलीस दलात झेप घेतली आहे. कोमल दत्तात्रय गायकवाड हिची धाराशिव पोलीस दलात 'महिला पोलीस कॉन्स्टेबल' म्हणून निवड झाली असून, दहिवडी गावातील पोलीस खात्यात भरती होणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज
कोमलचे वडील दत्तात्रय गायकवाड आणि आई सौ. अर्चना गायकवाड हे दोघेही अशिक्षित असून, शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. कोमलने आपल्या आई-वडिलांचे अपार कष्ट डोळ्यासमोर ठेवून, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासात सातत्य ठेवले. कोणत्याही महागड्या सोयीसुविधा नसताना केवळ स्वतःच्या मेहनतीवर तिने हे यश संपादन केले आहे.
गावात उत्सवाचे वातावरण
दहिवडी गावातून प्रथमच एक मुलगी पोलीस दलात दाखल झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. कोमलचा मोठा भाऊ पनवेल येथे नोकरीस असून धाकटा भाऊ दहिवडी येथेच शिक्षण घेत आहे. कोमलच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर मुलींसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.
या यशाबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश आप्पा पाटील, दि पिपल मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन सुरज पाटील, अर्जुन पाटील, शिवकुमार पाटील यांसह सर्व पाटील परिवार व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.
कोमलने मिळवलेले यश हे संपूर्ण गावचा अभिमान
--सुरज सुरेश पाटील, दहिवडीकर
"कोमलने मिळवलेले यश हे केवळ गायकवाड कुटुंबाचाच नाही, तर संपूर्ण दहिवडी गावाचा अभिमान आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून, शेतमजुरी करणाऱ्या बापाच्या लेकीने पोलीस वर्दी मिळवून दाखवली, ही गोष्ट आमच्या गावातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल."
— सुरज सुरेश पाटील, दहिवडीकर (चेअरमन दि.पिपल मल्टीस्टेट बॅंक, धाराशिव, पंढरपूर)
जिद्द व चिकाटी असेल तर यश नक्की मिळते हे कोमलने सिद्ध करून दाखवले
--अर्जुन सुरेश पाटील, दहिवडीकर
"जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करता येते, हे कोमलने सिद्ध करून दाखवले आहे. दहिवडी गावातून पोलीस दलात जाणारी ती पहिली मुलगी ठरली आहे, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. तिच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!"
— अर्जुन सुरेश पाटील,दहिवडीकर (प्रतिष्ठित नागरिक, दहिवडी)
0 Comments