"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज सोमवार, ३० मार्च रोजी तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथून सकाळी ८ वाजता 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रे'चा भव्य प्रारंभ झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कॉंग्रेसचे प्रवक्ते हणमंतराव पवार आणि धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. धिरज (भैय्या) पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली असून, यामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकरी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
या संघर्ष यात्रेत भर उन्हात एक लहान आंदोलक मुलगा या यात्रेत सहभागी झाल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या मुलाला आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते.
काय आहेत मुख्य मागण्या?
या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारसमोर मागण्यांची जंत्रीच सादर केली आहे. प्रामुख्याने:
भूसंपादन मोबदला: सुरत-चेन्नई महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट मोबदला मिळावा.
कर्जमाफी व अनुदान: नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान त्वरित द्यावे आणि सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा.
पीकविमा व हमीभाव: प्रलंबित पीकविमा तात्काळ मिळावा आणि कांद्याला ३००० रुपये हमीभाव व १५०० रुपये अनुदान मिळावे.
वीज व स्मार्ट मीटर: शेतीसाठी दिवसा ८ तास वीज मिळावी आणि सक्तीची वीज बिल वसुली व स्मार्ट मीटर बसवणे थांबवावे.
इतर प्रश्न: सोयाबीन-हरभरा खरेदीसाठी निधी, घरकुल योजनेचा निधी आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
सांयकाळी तुळजापुरात होणार सांगता सभा
सकाळी सुरतगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली ही यात्रा दिवसभर तुळजापूर मार्गावर मार्गक्रमण करणार आहे. या यात्रेचा समारोप आज सायंकाळी ५ वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालय येथे एका भव्य जाहीर सभेने होणार आहे. या सभेला राज्याचे विविध दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत.
सरकारच्या धोरणांवर टीका
"महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चौपट मोबदला मिळणे हा शेतकऱ्यांचा घटनादत्त अधिकार आहे. आम्ही केवळ मागणी करत नाही आहोत, तर तो अधिकार हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही.
--हर्षवर्धन सपकाळ,
प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस आय कमिटी
"एकीकडे शेतकरी अस्मानी संकटाने होरपळतोय आणि दुसरीकडे सरकार सक्तीची वीज बिल वसुली करून त्याला सुलतानी संकटात टाकत आहे. कांद्याला आणि सोयाबीनला जोपर्यंत योग्य हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला सुखाने झोपू देणार नाही. ही 'संघर्ष न्याय यात्रा' परिवर्तनाची नांदी ठरेल."
- हणमंतराव पवार
कॉंग्रेस प्रवक्ते आय कमिटी, महाराष्ट्र राज्य
"शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही आमची आरपारची लढाई आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही."
— ॲड. धिरज (भैय्या) पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
"हे महायुती सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे. 'पोकळ कर्जमाफी' जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही आणि हक्काचा पीकविमा मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष थांबणार नाही. हा रस्ता आता न्यायाचा रस्ता आहे!"
--अमोल कुतवळ
नगरसेवक, तुळजापूर
या यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रदेश सरचिटणीस डॉ.जितेंद्र देहाडे, उदय पाटील, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास (अप्पा )शिंदे, प्रदेश सचिव अमर खानापूरे, राजाभाऊ शेरखाने,नगरसेवक अमोल कुतवळ, भाऊसाहेब पावडे, (नांदेड), राहुल सोनवणे (बीड), स्मिता शहापूरकर प्रदेश सचिव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग कुंभार,जुबेर शेख,किरण माधव (लातूर) (काटी) यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा 'Only न्यूज धाराशिव'.
0 Comments