तुळजापूर/उमाजी गायकवाड
रंगपंचमी म्हणजे केवळ रंगांचा सण नसून तो मानवी मनातील द्वेष विसरून नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा उत्सव आहे. हाच संदेश अधोरेखित करत तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील पुजारी नगरमध्ये अत्यंत उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने नैसर्गिक रंगपंचमी साजरी करण्यात आली. रासायनिक रंगांना फाटा देत केवळ नैसर्गिक रंगांचा वापर करून आरोग्याप्रती जागरूक राहण्याचा एक नवा पायंडा येथील रहिवाशांनी पाडला आहे.
रासायनिक रंगांना दिला 'दे धक्का'; आरोग्याला प्राधान्य बाजारात मिळणाऱ्या रासायनिक रंगांमुळे त्वचेचे आणि डोळ्यांचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. हा 'रंगांचा बेरंग' टाळण्यासाठी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या संकल्पनेतून यंदा नैसर्गिक रंगांची उधळण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुजारी नगरमधील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कोरड्या नैसर्गिक रंगांनी एकमेकांचे चेहरे रंगवले. यावेळी चित्रकला आणि सण यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला; अनेकांच्या चेहऱ्यावर आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या होत्या.
गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकली
'वंश मंगल कार्यालय' येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक लोकगीते आणि आधुनिक गाण्यांच्या तालावर पुजारी नगरमधील तरुणाईने ठेका धरला. नैसर्गिक रंगांची उधळण आणि मैत्रीचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. सण साजरा केल्यानंतर सर्व सदस्यांसाठी गणेश पुजारी यांच्या वतीने विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे या उत्सवात अधिकच गोडवा निर्माण झाला.
मान्यवरांची उपस्थिती
या पर्यावरणपूरक सोहळ्यात पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, उपाध्यक्ष उमाजी गायकवाड, श्रावण मामा पवार, सिध्देश्वर इंगोले, सतिश खोपडे, शिवशंकर म्हमाणे, बापू जगदे, सोमनाथ पुजारी, आबा पुजारी, वैभव ताटे, प्रतिक कांबळे, प्रभाकर नलावडे, आदर्श कांबळे, डॉ. राजेश पाटील, शितल अमृतराव, माजी सैनिक पवार बी.जे., जयराम मोकाशे, मंडळ अधिकारी भाकरे, शिवाजी विभूते, आप्पा भोसले, अमोल भावसार, अमोल भोसले, बाबु पुजारी, मल्लेश विभूते, ग्रामसेवक शिवाजी चव्हाण यांच्यासह पुजारी नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नात्यांमधील भिंती पाडून सर्वांना एकत्र आणणे, हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश
--गणेश पुजारी, अध्यक्ष पुजारी नगर फाऊंडेशन
"सण हे आनंद देण्यासाठी असतात, त्रास देण्यासाठी नाही. रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम पाहता, आम्ही यंदा केवळ नैसर्गिक रंगांचा वापर करून 'पर्यावरणपूरक रंगपंचमी' साजरी करण्याचा संकल्प केला. पुजारी नगरमधील प्रत्येक सदस्याने याला सकारात्मक प्रतिसाद दिला, याचा सार्थ अभिमान वाटतो. नात्यांमधील भिंती पाडून सर्वांना एकत्र आणणे, हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सुरक्षित सण साजरा करून आम्ही समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही आमचे फाऊंडेशन असेच सामाजिक उपक्रम राबवत राहील."
— गणेश पुजारी (अध्यक्ष, पुजारी नगर फाऊंडेशन)
0 Comments