Only न्युज धाराशिव वृत्तसेवा विशेष
तुळजापूर | उमाजी गायकवाड
कोरोना काळातील लॉकडाऊनच्या जखमा ताज्या असतानाच, आता पुन्हा एकदा सर्वसामान्य जनता, व्यावसायिक आणि गृहिणी मोठ्या आर्थिक व व्यावहारिक संकटात सापडली आहेत. सध्या अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा जागतिक परिणाम थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला असून, गॅस सिलिंडरचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे.
काय आहे नेमकी परिस्थिती?
गेल्या काही दिवसांपासून गॅस वितरणाची साखळी विस्कळीत झाली असून, एजन्सीधारकांकडे सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने लोकांची धावाधाव सुरू आहे. या परिस्थितीमुळे केवळ गृहिणीच नव्हे, तर छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिकही पुरते हवालदिल झाले आहेत.
हॉटेल व्यवसायावर गंडांतर
गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी व्यवसाय सुरू ठेवले आहेत, त्यांना दुप्पट-तिप्पट दर देऊन काळ्या बाजारातून सिलिंडर घेण्याची वेळ आली आहे, परिणामी वाढत्या महागाईचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसत आहे.
पुन्हा 'चुली'चे दिवस?
गॅस मिळत नसल्याने आणि गॅसचे वाढते दर परवडत नसल्याने, आता अनेक कुटुंबांनी पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे कल वाढवला आहे. आधुनिकतेकडून पुन्हा मागे जात, लाकूड-पाचोळा गोळा करून स्वयंपाक करण्याची वेळ आल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
व्यावसायिकांची मागणी: सरकारने तातडीने या परिस्थितीची दखल घेऊन गॅसचा पुरवठा सुरळीत करावा.
गृहिणींची व्यथा: सिलेंडरच्या प्रतीक्षेत दिवस वाया जात आहेत, कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे.
आता या महागाईच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या आगीतून सर्वसामान्यांची सुटका कधी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
0 Comments