"ONLY न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि लाल मातीतील शौर्याचा सर्वोच्च सोहळा असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा बिगुल वाजला आहे! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, वाघोली (पुणे) येथे आयोजित होणाऱ्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लाच्या खांद्यावर विसावणारी 'मानाची गदा' बुधवारी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करण्यात आली. भक्ती आणि शक्तीच्या या अभूतपूर्व संगमाने संपूर्ण धाराशिव जिल्हा कुस्तीमय झाला आहे.
ढोल-ताशांचा गजरात आणि फटाक्यांच्या अतिषबाजीत भव्य मिरवणूक
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ना. पै. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वतीने देण्यात येणारी ही दैदीप्यमान गदा काल सकाळी १०:३० वाजता तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. गदेचे आगमन होताच उपस्थित कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची भव्य अतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत या गदेची भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली.
आई भवानीचा मल्लांना शुभाशीर्वाद!
मिरवणुकीनंतर ही मानाची गदा मंदिराच्या गाभाऱ्यात नेण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या चरणी विधीवत अभिषेक आणि पूजन करून, 'येणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मातीतील सर्वोत्तम मल्लाचा विजय होवो', असे साकडे घालण्यात आले. वाघोली (पुणे) येथील स्पर्धेचे मुख्य आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून हा पवित्र पूजन सोहळा संपन्न झाला.
दिग्गजांची मांदियाळी आणि पैलवानांचा उत्साह
या सोहळ्यासाठी कुस्ती क्षेत्रातील दिग्गज आणि राजकीय मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी रामकृष्ण अण्णा सातव पाटील (आयोजक, वाघोली),पै.विशाल नाना देवकर (अध्यक्ष, धाराशिव जिल्हा कुस्तीगीर संघ),रामचंद्र (आबा) रोचकरी (प्रभारी नगराध्यक्ष),विशाल रोचकरी,आनंद रोचकरी,बबलू धनके, श्रीराम गोडगे,भारत डाकवाले,अभिराम पाटील माऊली गोडगे,बालाजी मिस्कीन,हरिष रोचकरी,आप्पा कारंडे,रामेश्वर कारले यांच्यासह धाराशिव जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी,वस्ताद आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा तपशील: > ही ऐतिहासिक ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा १८ ते २२ मार्च या कालावधीत वाघोली (पुणे) येथे रंगणार आहे. यंदा ही मानाची गदा कोणता वाघ आपल्या खांद्यावर मारणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आमच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी 'Only न्युज धाराशिव'ला फॉलो करा!
0 Comments