Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना देत आहे जागतिक विचारांची नवी दिशा; AI मुळे उद्योजकतेचे दरवाजे उघडणार”

मुरुम | प्रतिनिधी
“नवे शैक्षणिक धोरण 2020 हे केवळ माहितीपुरते शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नवोपक्रम, संशोधनवृत्ती आणि जागतिक घडामोडींची जाणीव निर्माण करणारे आहे,” असे प्रतिपादन डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी केले. ते दि. ४ एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्पष्ट केले की, आजच्या शिक्षणपद्धतीत केवळ पाठांतर न करता कृती-आधारित शिक्षण, प्रकल्पाधारित अध्ययन आणि संशोधनाच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, स्वतंत्र विचार, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित होतो.

दुसऱ्या सत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी, जागतिक व्यापार व्यवस्थेतील बदल आणि अलीकडील युद्धांचा व्यापार, उद्योग व रोजगार क्षेत्रावर होणारा परिणाम याचे सखोल विश्लेषण केले. बदलत्या जागतिक परिस्थितीचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे होते. यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, पुणेचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सचिव पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात यशवंत शितोळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे मराठवाड्यातील तरुणांसाठी उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. स्थानिक समस्यांवर आधारित संशोधनाला AI ची जोड मिळाल्यास ‘Idea ते Startup’ हा प्रवास अधिक वेगाने घडू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
बीजभाषणात शैलेंद्र गोस्वामी यांनी संशोधन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका अधोरेखित करत, विषय निवड ते निष्कर्ष मांडणीपर्यंत AI चा प्रभावी वापर होत असल्याचे सांगितले. तसेच डॉ. शैलेश वधेर यांनी संशोधन पद्धतीशास्त्रात AI कसे उपयुक्त ठरते यावर सविस्तर विवेचन केले.

चौथ्या सत्रात ENSIN फोरम, पुणेचे संचालक संजय जगताप यांनी ‘आयडिया थॉन, इनोवेशन आणि स्टार्टअप’ या विषयावर मार्गदर्शन करत युवकांनी नोकरीबरोबरच उद्योजकतेच्या संधी स्वीकारण्याचे आवाहन केले.

या राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून एकूण ३६७ प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद देवकर यांनी केले, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले, तर आभार संयोजक डॉ. अजित आष्टे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक प्राध्यापक व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments