Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गंजेवाडीत वन्यप्राण्यांचा थरार; १० शेळ्या फस्त, ७ गंभीर जखमी! पशुपालक शेतकरी हवालदिल! तारेचे कुंपण तोडून मृत्यूचा शिरकाव; गंजेवाडीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १७ शेळ्यांना केले लक्ष्य! शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान; परिसरात दहशतीचे वातावरण,पोलीस प्रशासन व वनविभागाकडून पंचनामा पूर्ण

"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकाच रात्री १० शेळ्यांचा मृत्यू झाला असून ७ शेळ्या गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यामुळे पशुपालक शेतकरी महावीर मारुती गंजे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महावीर गंजे यांची गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर १५ एकर शेती आहे. शेतातच त्यांनी बंदिस्त शेळीपालन सुरू केले असून, सुरक्षिततेसाठी सर्व बाजूंनी तारेचे कुंपणही घातले आहे. गुरुवार दि. २ रोजी शेतातील कामे आटोपून गंजे गावाकडे गेले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी जेव्हा ते पुन्हा शेतात पोहोचले, तेव्हा त्यांना समोरचे दृश्य पाहून मोठा धक्का बसला. कुंपणाच्या आत १० शेळ्या मृतावस्थेत पडल्या होत्या, तर ७ शेळ्या पोट फाडलेल्या अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होत्या.

मोठा आर्थिक फटका
या हल्ल्यात पाच मोठ्या शेळ्या, एक बोकड आणि लहान पिलांचा समावेश आहे. जखमी सात शेळ्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महावीर गंजे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामुख्याने याच व्यवसायावर अवलंबून होता. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने हे कुटुंब आता आर्थिक संकटात सापडले आहे.

प्रशासनाकडून पाहणी व पंचनामा
घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस कर्मचारी उमेश माने, संजय कळमदने, मनोज गोबाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव चोतमल आणि वनविभागाच्या वनरक्षक शेवाळे, वन कर्मचारी कल्याण सरडे,साधू शिंदे यांनी मृत व जखमी शेळ्यांचा सविस्तर पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला एखाद्या हिंस्त्र वन्यप्राण्याने केल्याचे समोर येत आहे. मात्र, नेमका प्राणी कोणता, हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

"आमच्या कुटुंबाचा मुख्य आधार हा शेळीपालन व्यवसायच आहे. एका भीषण रात्रीने आमचे संसार उघड्यावर पाडले असून आम्ही पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलो आहोत. सरकारने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आर्थिक मदत करावी आणि परिसरात फिरणाऱ्या हिंस्त्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा."
— महावीर गंजे (बाधित शेतकरी)

परिसरात भीतीचे वातावरण
गंजेवाडी परिसरात रात्री-अपरात्री शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना बाहेर पडावे लागते. मात्र, आता दिवसाढवळ्या किंवा रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास शेतकरी धजावत नाहीत. वनविभागाने या प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

✍️ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा 'Only न्यूज धाराशिव'

Post a Comment

0 Comments