तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु.) येथील ऐतिहासिक श्री नागनाथ देवस्थानच्या ट्रस्ट नोंदणीबाबत जिल्हा न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत न्यायालयाने विद्यमान ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिला असून, यामुळे मंदिर आता पुन्हा मूळ पुजाऱ्यांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थ (बु.) येथील श्री नागनाथ देवस्थानचे मुख्य पुजारी सुधीर शहाजी पुरी व अन्य पुजाऱ्यांना विश्वासात न घेता, देवस्थानची बेकायदेशीररीत्या ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली होती. या बेकायदेशीर नोंदणीविरुद्ध सुधीर पुरी यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय, लातूर येथे दाद मागितली होती. मात्र, तिथून त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही. धर्मादाय आयुक्तांनी त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर, पुजाऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत सिव्हील एम.ए. क्र. ४१/२०१७ नुसार अपील दाखल केले होते.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष
या प्रकरणावर मागील ९ वर्षांपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. पुजाऱ्यांच्या वतीने ॲड. पी. एम. जोशी (धाराशिव) यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले की:
केवळ ट्रस्ट नोंदणीची माहिती पक्षांना होती, या कारणास्तव बेकायदेशीर नोंदणी वैध ठरू शकत नाही.
संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी (लातूर) दिलेला निकाल कायद्याच्या चौकटीत बसणारा नसल्याने त्यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
मुंबई सार्वजनिक ट्रस्ट अधिनियम, १९५० च्या कलम ७२(अ) ची व्याप्ती केवळ माहिती असण्यापुरती मर्यादित ठेवता येणार नाही.
काय दिला आदेश?
जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर २५ मार्च २०२६ रोजी निकाल दिला:
१. सिव्हिल एम.ए. क्र. ४१/२०१७ मंजूर करण्यात आला आहे.
२. संयुक्त धर्मादाय आयुक्त, लातूर यांनी ३०/०१/२०१७ रोजी दिलेला निकाल आणि आदेश रद्द व निरस्त करण्यात आला आहे.
३. सुधीर शहाजी पुरी आणि गजेंद्र बापू पुरी यांनी दाखल केलेली पुनरीक्षण याचिका मंजूर करण्यात आली आहे.
भाविकांची गैरसोय दूर होणार
या निर्णयामुळे बेकायदेशीर ट्रस्टची नोंदणी रद्द झाली असून, मंदिर प्रशासनाचा ताबा आता मूळ पुजाऱ्यांकडे जाणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून देवस्थानच्या व्यवस्थापनात निर्माण झालेला अडथळा दूर होऊन, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय आता थांबेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ब्युरो रिपोर्ट: Only न्युज धाराशिव
0 Comments