📰 "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने एकाच वेळी निरोप व सन्मान असा दुहेरी सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दिमाखात गौरव करण्यात आला.
जागजी व पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम पाटील व डॉ. महेश दळवे यांना पीजी शिक्षणासाठी अनुक्रमे मुंबई व सोलापूर येथे प्रवेश मिळाल्याने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
दरम्यान, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त केलेल्या आशा सुपरवायझर रेखाताई गुंजकर-कदम यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी मोहिमेत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आरोग्य सेवक बापू पवार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून समुद्रवाणी येथील आशा सुपरवायझर कविताताई धनके उपस्थित होत्या.
या प्रसंगी डॉ. पाटील, डॉ. दळवे आणि रेखाताई गुंजकर-कदम यांनी आरोग्य क्षेत्रातील अनुभव व प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमास तालुका सुपरवायझर तसेच राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार विजेते तानाजी क्षिरसागर यांच्यासह अमोल साळुंके, विकास अकोसकर, अमित गाडे, सचिन तटाळे, संजय माने, वाजीद शेख, सुनील नाईकवाडी, सौ. पेठे, सौ. पवार, नितीन साळुंके, दीपक जाधव आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
0 Comments