📰 "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’ अंतर्गत तुळजापूर ग्रामीण मंडळाचा दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग तामलवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिराचा समारोप दिमाखात झाला असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आगामी राजकीय आव्हाने लक्षात घेऊन संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना प्रभावी कार्यपद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले. समारोप सत्रात बोलताना आमदार पाटील यांनी संघटना बळकट करणे, पक्षाची कार्यपद्धती जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करणे, हेच प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांची निष्ठा आणि समर्पण पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या ऊर्जेच्या बळावर भविष्यात जनसेवेचे कार्य अधिक जोमाने आणि एकजुटीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गात विविध सत्रांच्या माध्यमातून ‘अंत्योदय’ विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच पक्षशिस्त आणि बूथ पातळीवरील संघटन बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा संघचालक ॲड. रवींद्र कदम, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष महादेव जाधव, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख, अस्मिताताई कांबळे, जिल्हा प्रशिक्षण संयोजक साहेबराव घुगे, पंचायत समिती सदस्य संतोष बोबडे, निशिगंधा पाटील, यशवंत (अण्णा) लोंढे, बसवंतप्पा मसुते, विजय निंबाळकर,रोहित पाटील, दिगंबर खराडे यांच्यासह तुळजापूर ग्रामीण मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments