Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

निसर्गाची अवकृपा पण जिद्दीचा विजय! तुळजापूरात मुसळधार पावसातही रंगला 'अयोध्या नगरी'तील शाही विवाह ! ऐन मुहूर्तावर पावसाची बॅटिंग; 'वंश पॅलेस'मध्ये महेश-ऋतुजा विवाहबद्ध, पुजारी बंधूंच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
​तुळजापूर: भक्ती, शक्ती आणि संघर्षाचा एक अनोखा अध्याय मंगळवारी तुळजापूरच्या भूमीत लिहिला गेला. निमित्त होते, प्रतिष्ठित पुजारी बंधूंपैकी चि. महेश विश्वनाथ पुजारी आणि चि.सौ.का. ऋतुजा अनिल रोचकरी यांचा शाही विवाह सोहळा. तब्बल दोन एकर परिसरात साकारलेली हुबेहूब 'अयोध्या नगरी' आणि ७०० फोकसचा झगमगाट असा सगळा लवाजामा तयार असतानाच, निसर्गाने आपली खेळी खेळली. ऐन मुहूर्तावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने नियोजित सोहळ्यात काहीसा व्यत्यय आला, मात्र पुजारी बंधूंच्या जिद्दीपुढे निसर्गालाही नतमस्तक व्हावे लागले. अखेर हा सोहळा 'वंश पॅलेस'च्या दिमाखदार हॉलमध्ये हजारो वऱ्हाडींच्या साक्षीनं संपन्न झाला.

​पावसाचे विरजण, पण सेल्फीचा उत्साह कायम
दोन एकर जागेत साकारलेली अयोध्या नगरी हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. मुसळधार पावसामुळे मुख्य विधी हॉलमध्ये हलवावे लागले तरी पाहुण्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. पाऊस थांबताच हजारो पाहुण्यांनी अयोध्या नगरीच्या देखण्या सेटवर जाऊन 'सेल्फी'चा आनंद लुटला. प्रभू श्रीराम,आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींसोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

​संकटावर स्वार झालेली 'राम-लक्ष्मण' जोडी
या सोहळ्याच्या निमित्ताने थोरले बंधू गणेश पुजारी यांची आपल्या धाकट्या भावाप्रती असलेली ओढ संपूर्ण जिल्ह्याने अनुभवली. १९ एप्रिलला झालेल्या वादळात अयोध्या नगरीचा सेट कोलमडला होता, तो त्यांनी अवघ्या २४ तासात पुन्हा उभा केला. पुन्हा मंगळवारी पावसाने संकट उभे केले, तरीही गणेश पुजारी यांनी डगमगून न जाता चोख व्यवस्था राखली. त्यांच्या या 'राम-लक्ष्मण' जोडीसारख्या प्रेमाची चर्चा आता जिल्हाभर रंगली आहे.

​"निसर्गाची साथ मिळाली नाही, तरी माझ्या दोन्ही जावयांनी दाखवलेली जिद्द कौतुकास्पद आहे. एका बाजूला वादळानं सेट पाडला, तरी गणेशने तो जिद्दीनं पुन्हा उभा केला आणि पावसातही महेशने संयम राखत हा सोहळा पार पाडला. संकटावर मात करून कार्य कसं पूर्ण करावं, हे या दोघांनी दाखवून दिलं."
— अनिल नारायण रोचकरी (वधू पिता)
सामाजिक बांधिलकीचा 'मिष्टान्न' सुगंध
विवाहाचा थाट सुरू असतानाच पुजारी परिवाराने समाजाप्रती आपले कर्तव्य विसरले नाही. यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलातील ३६६ निवासी विद्यार्थ्यांना या सोहळ्यानिमित्त खास मिष्टान्न भोजन देण्यात आले. "आनंद वाटल्याने वाढतो," हेच या उपक्रमातून पुजारी परिवाराने सिद्ध केले.
राजेशाही पाहुणचार
तीन मोठ्या पार्किंगची व्यवस्था, २०० हून अधिक स्वयंसेवकांचे नियोजन आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी गेटवर स्वतः उभे असलेले विश्वनाथ पुजारी व अनिल रोचकरी यांच्यामुळे पाहुणचारात कुठेही कमतरता भासली नाही. रात्रीच्या वेळी झालेल्या भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीने तुळजापूरचे आकाश उजळून निघाले होते.

​विवाह सोहळा एक नजर:
​नवदाम्पत्य: चि. महेश आणि चि.सौ.का. ऋतुजा
​मुहूर्त: मंगळवार, २१ एप्रिल २०२६
​स्थळ: वंश पॅलेस, नळदुर्ग रोड, तुळजापूर.
​विशेष सहकार्य: बापूराव पुजारी,आबा पुजारी, सोमनाथ पुजारी व समस्त पुजारी-रोचकरी परिवार.
​निसर्गाच्या आव्हानावर मात करून संपन्न झालेला हा 'अयोध्या नगरी'तील विवाह सोहळा तुळजापूरकरांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहील.

​'Only न्युज धाराशिव' - थेट, सत्य आणि सर्वात जलद!

Post a Comment

0 Comments