"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | उमाजी गायकवाड
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता महाप्रशिक्षण अभियाना’च्या धाराशिव जिल्हा प्रशिक्षण वर्ग प्रमुखपदी ज्येष्ठ विधीज्ञ आणि अनुभवी संघटक ॲड. अनिल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची वैचारिक बांधणी करण्याची मोठी जबाबदारी काळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
मे २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हे महाप्रशिक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि बुथ स्तरावरील संघटन कौशल्य तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ॲड. अनिल काळे यांची प्रशासकीय पकड आणि पक्ष संघटनेतील दीर्घ अनुभव लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रशिक्षण वर्गांचे नियोजन अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
वैचारिक सज्जतेवर भर
भाजप प्रदेश कार्यालय आणि मराठवाडा विभाग प्रशिक्षण प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान चालणार आहे. या नियुक्तीबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले की, "पक्षाचा कार्यकर्ता केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता तो वैचारिकदृष्ट्या सक्षम असावा, यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. ॲड. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल आणि पक्षसंघटना अधिक मजबूत होईल."
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
ॲड. अनिल काळे यांच्या निवडीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना ॲड. काळे म्हणाले की, "पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
0 Comments