Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

“ढोकी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव – बियाणे महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवाला ग्रामस्थांकडून दाद!”

ढोकी/प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (जि. धाराशिव) यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ढोकी ग्रामपंचायतीने विशेष अभिनंदनाचा ठराव मंजूर करत राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठवला आहे. महामंडळाचे कार्य पारदर्शक असून शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देत असल्याने हा ठराव घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दि. २६ जानेवारी रोजी सरपंच अश्विनी माळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या ५० वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या ठरावानुसार, महामंडळाने गेल्या पन्नास वर्षांत शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे पुरवले असून त्यांचे दरही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतील असे ठेवले आहेत. त्यामुळे बाजारातील बियाण्यांच्या दरवाढीवर नियंत्रण राहण्यास मदत झाली आहे. तसेच बीजोत्पादन क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. याशिवाय, बीजोत्पादक शेतकऱ्यांशी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आपुलकीने संवाद साधत सन्मानपूर्वक वागणूक देतात, लाचखोरीचा लवलेश नसल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले. राज्य शासनाच्या इतर कार्यालयांच्या तुलनेत हे अनुभव वेगळे व कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

महामंडळाचे पारदर्शक व स्वच्छ प्रशासन पाहता ग्रामसभेत त्यांचे जाहीर कौतुक करण्यात आले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांनी ग्रामस्थांच्या भावनांची दखल घ्यावी, अशी विनंती ठरावाद्वारे करण्यात आली.

या ठरावास उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दिली. ठरावाचे सुचक सतीश मुरलीधर पाटील तर अनुमोदक शामराव छगनराव देशमुख होते.

या ग्रामसभेला सरपंच अश्विनी माळी, उपसरपंच अमोल समुद्रे, ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments