"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ करण्यासाठी राबविण्यात येत असलेला वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सध्या प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यां व शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘वृक्षारोपण व संवर्धन’ ही चळवळ प्रभावीपणे पुढे सरकत असून, शालेय परिसर हिरवागार बनला आहे.
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि भौतिक सुखसोयींच्या अतिरेकामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच जाणीवेची पेरणी विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासून व्हावी, या उद्देशाने शाळेत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, ते दररोज शाळेतील रोपांना पाणी घालणे, नवीन रोपे लावणे आणि त्यांची निगा राखणे यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. प्रत्यक्ष कृतीतून झाडांचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाचे धडे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम व जबाबदारीची भावना वाढीस लागली आहे.
श्रीमती ज्ञानेश्वरी शिंदे-नरवडे यांच्या संकल्पनेतून व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम आकारास आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या खाऊसाठी मिळालेल्या पैशांतून शाळेसाठी कुंड्या भेट दिल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी घरातून व शेतातून रोपटी आणून त्यांची लागवड केली आहे. या रोपांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही त्यांनी आनंदाने स्वीकारली आहे.
प्रत्येक कुंडीवर विद्यार्थ्यांचे नाव लिहिण्यात आले असून, काहींनी स्वतःच नावांची सजावट केली आहे. त्यामुळे या उपक्रमाशी त्यांचा भावनिक संबंध अधिक दृढ झाला आहे. इतर विद्यार्थ्यांनाही या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा मिळत असून, शाळेत कुंड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
शालेय परिसरात कुंड्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली असून, त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. हिरवागार वातावरण, टवटवीत रोपे आणि स्वच्छता यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्नतेचा अनुभव मिळत आहे.
दरम्यान, पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून शाळेत पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीही केली जात आहे. हे खत रोपांना वापरल्यामुळे त्यांची वाढ अधिक जोमाने होत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन व सेंद्रिय शेतीचेही प्रत्यक्ष ज्ञान मिळत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजाराम वाघमारे, राजकुमार घोडके, विठ्ठल नरवडे, ज्ञानेश्वरी शिंदे, स्मिता पाटोळे, नवल धाकपाळे, जयश्री राऊत आदी शिक्षक परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांना जबाबदार व सजग नागरिक बनविण्याचा हा प्रयत्न भविष्यात हरित भारताच्या दिशेने भक्कम पाऊल ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
0 Comments