"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तंत्रज्ञानाच्या क्रांतीने संपूर्ण जग एका 'क्लिक'वर आणले असले, तरी याच तंत्रज्ञानाने माणसांमधील भावनिक ओलावा मात्र आटवला आहे. कधीकाळी गप्पांनी ओसंडून वाहणारे घराचे ओटे आणि खेळाडूंनी गाजणारी मैदाने आज मोबाईलच्या निळ्या प्रकाशात शांत झाली आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे समाज केवळ शारीरिकच नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही एकमेकांपासून दूर जात असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
नात्यांत ‘डिजिटल’ भिंत आणि संवादाचा अभाव
एकाच छताखाली राहूनही घरातील सदस्य एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईलवर जास्त वेळ घालवत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर सक्रिय राहून आपण प्रत्यक्ष भेटीगाठी किंवा फोनवरील संभाषणातून दूर होत आहोत. सोशल मीडियावरील 'रीड रिसिप्ट्स' मुळे त्वरित उत्तर देण्याचा दबाव वाढतो, ज्यामुळे मानसिक थकवा आणि तणाव वाढून नात्यात दुरावा निर्माण होतो. वाढदिवस किंवा दुःखद प्रसंगी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी फक्त फोनवर शुभेच्छा किंवा श्रद्धांजली वाहण्याचे प्रमाण वाढले असून, ही डिजिटल औपचारिकता माणसाला एकाकीपणाकडे ढकलत आहे.
मैदाने शांत, रील्सचा धिंगाणा
एकेकाळी तरुणाईमध्ये कबड्डी, कुस्ती, मल्लखांब, नृत्य आणि नाटकाची मोठी ओढ होती. आता मात्र ही मैदाने सुनसान झाली असून, तरुणाई व्यायामशाळेऐवजी मोबाईल कॅमेऱ्यासमोर नाचणारे ‘रील्स मेकर्स’ बनण्यात धन्यता मानत आहे. खरी मेहनत घेणारे कलाकार कमी होत असून, दोन मिनिटांच्या व्हिडीओलाच 'कला' मानण्याची घोडचूक केली जात आहे. शारीरिक हालचाल कमी झाल्याने स्थूलता, मानसिक ताण आणि एकाग्रतेचा अभाव अशी लक्षणे तरुणांमध्ये बळावत आहेत.
सगळं काही 'स्मार्ट' फोनात!
तंत्रज्ञानाने अनेक भौतिक वस्तूंचे अस्तित्व संपवून त्यांना मोबाईलमध्ये सामावून घेतले आहे यामध्ये प्रामुख्याने
कॅल्क्युलेटर व कॅमेरा: भौतिक कॅल्क्युलेटर आणि वेगळा कॅमेरा बाळगण्याचे प्रमाण आता नगण्य झाले आहे.
लग्न पत्रिका: नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून आमंत्रण देण्याऐवजी आता 'डिजिटल पत्रिका' पाठवण्यावर भर दिला जात आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष भेटीतील मायेचा ओलावा कमी झाला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय: सायंकाळी ७ ते ९ 'नो मोबाईल झोन'
मोबाईलच्या या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने एक अत्यंत धाडसी आणि स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल न वापरण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.
या दोन तासांच्या काळात नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबाशी संवाद साधावा, मुलांनी अभ्यास करावा आणि शारीरिक खेळांकडे वळावे, असा यामागचा मुख्य उद्देश आहे. सौ. अर्चनाताई पाटील यांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, "माणुसकी आणि संवाद जिवंत ठेवण्यासाठी हे 'डिजिटल डिटॉक्स' काळाची गरज आहे," अशी भावना व्यक्त होत आहे. या स्वागतार्ह निर्णयासोबतच जिल्हा प्रशासनाकडून गावोगावी व्यायामशाळा उभारणे आणि शाळा स्तरावर क्रीडा महोत्सव बंधनकारक करावेत अशी मागणी जाणकारांकडून होत आहे.
मान्यवरांची प्रतिक्रिया...
जिल्हा परिषदेचा 'नो मोबाईल झोन' निर्णय मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल...
"आजची मुले तासनतास मोबाईलच्या स्क्रीनवर खेळ खेळण्यात घालवत आहेत, ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होत आहे. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता, मैदानावरील खेळही तितकेच महत्त्वाचे आहेत. जिल्हा परिषदेचा 'नो मोबाईल झोन' निर्णय मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. पालकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे."
— अध्यक्ष बसवनप्पा मसुते त्रिबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, तामलवाडी, ता. तुळजापूर
वाचन संस्कृती आणि संस्कारांचे महत्त्व
"मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमधील वाचनाची आवड आणि संवादाचे संस्कार लोप पावत चालले आहेत. सायंकाळची वेळ ही कुटुंबात संस्कार घडवण्याची असते, तिथे आता 'रिल्स'ने जागा घेतली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचा हा उपक्रम म्हणजे हरवत चाललेली संवाद संस्कृती पुन्हा जिवंत करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न आहे. यामुळे वाचन संस्कृतीला नक्कीच बळ मिळेल."
— सतीश रामचंद्र खोपडे, मुख्याध्यापक, छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय, मसला खु. ता.तुळजापूर
सर्जनशीलता आणि कला गुणांना वाव
"खरा कलाकार रंगमंचावर किंवा मैदानात घाम गाळून घडतो, मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर नाचून नाही. तंत्रज्ञानाचा वापर हा अभ्यासासाठी असावा, व्यसनासाठी नको. शिक्षणप्रेमी म्हणून मला वाटते की, प्रत्येक गावात व्यायामशाळा आणि क्रीडांगणे गजबजली तरच खऱ्या अर्थाने सशक्त पिढी घडेल. जिल्हा परिषदेचा हा निर्णय तरुणाईला पुन्हा एकदा कलेच्या आणि क्रीडा क्षेत्राच्या मुख्य प्रवाहाकडे वळवणारा आहे."
— संतोष (दादा)बोबडे,
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर
जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय दूरदृष्टीचा आणि समाजपरिवर्तनाचा पाया आहे
"आमच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी घेतलेला 'नो मोबाईल झोन'चा निर्णय हा दूरदृष्टीचा आणि समाजपरिवर्तनाचा पाया आहे. आजच्या डिजिटल युगात नात्यांमधील संवाद हरवत असताना, कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी ही संकल्पना अत्यंत गरजेची होती. तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावात आणि घरात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करावा, पण संवादासाठी वेळ राखून ठेवावा, हा विचार घेऊनच आम्ही जनतेमध्ये जनजागृती करणार आहोत."
----मा. श्री. विक्रमसिंह देशमुख (सभापती, पंचायत समिती तुळजापूर)
तंत्रज्ञानाने सोयी दिल्या, पण माणसांमधील जिव्हाळा हिरावून घेतला
"मंगल कार्यालयांच्या माध्यमातून आम्ही अनेक कुटुंबांचे आनंदाचे क्षण जवळून पाहतो. मात्र, हल्ली या आनंदाच्या क्षणांमध्येही माणसांच्या हातात हात असण्याऐवजी मोबाईल जास्त दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. तंत्रज्ञानाने सोयी दिल्या, पण माणसांमधील जिव्हाळा हिरावून घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी घेतलेला 'डिजिटल डिटॉक्स'चा निर्णय हा तुळजापूरच्या आणि जिल्ह्याच्या सामाजिक आरोग्यासाठी अतिशय आश्वासक आहे. पुजारी नगर फाऊंडेशनच्या वतीने आम्ही या मोहिमेचे पूर्ण समर्थन करतो आणि तरुणांनी मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून पुन्हा एकदा मैदानांवर व रंगमंचावर आपली कला सादर करावी, असे आवाहन करतो."
---श्री. गणेश पुजारी (अध्यक्ष, पुजारी नगर फाऊंडेशन, तुळजापूर तथा संचालक श्रीनाथ व वंश मंगल कार्यालय, तुळजापूर)
✍️'Only न्युज धाराशिव' – जिल्ह्यातील घडामोडींचा अचूक वेध!
0 Comments