Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सेवानिवृत्ती नव्हे तर हा सामाजिक सेवेचा प्रारंभ! माजी मंत्री बसवराज पाटील यांचे प्रतिपादन; मुरूम येथे कार्यालयीन अधीक्षक राजू ढगे यांचा भव्य सेवापूर्ती सोहळा संपन्न

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
मुरूम | प्रा.सुधीर पंचगल्ले
 "नगर शिक्षण विकास मंडळाच्या माध्यमातून माधवराव (काका) पाटील यांनी ज्या ध्येयाने ही संस्था उभी केली, त्या विश्वासाला कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून सार्थ ठरवले आहे. महाविद्यालयातील कर्मचारी नियतवयोमानानुसार पदावरून निवृत्त होत असले, तरी ही त्यांची सेवानिवृत्ती नसून खऱ्या अर्थाने सामाजिक सेवेचा हा नवा प्रारंभ आहे," असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपचे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक राजू ढगे यांचा सेवापूर्ती सोहळा सोमवारी (दि. ३०) नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सपत्नीक यथोचित सत्कार
कार्यक्रमात बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते राजू ढगे आणि त्यांच्या पत्नी मायाताई ढगे यांचा संपूर्ण आहेर देऊन सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रारंभी चैतन्यमूर्ती माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संस्थेचे नाव लौकिक करण्यात कर्मचाऱ्यांचा वाटा
बसवराज पाटील पुढे म्हणाले की, "वैजनाथराव ढगे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या पाल्याला उत्तम संस्कार दिले. राजू ढगे यांनी काकांवरील निष्ठा कायम ठेवत कष्टाच्या जोरावर संस्थेत काम केले. चांगल्या विचारांची माणसे घडवणे ही या संस्थेची परंपरा राहिली असून, ढगे यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांनी समाजासाठी आपले योगदान सुरू ठेवावे."

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, माजी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, बीडचे कार्यकारी अभियंता शरीफ पटेल, धनराज मंगरूळे, मदन पाटील, देवेंद्र कंटेकुरे, प्राचार्य उल्हास घुरघुरे, इरफान मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृतज्ञता व्यक्त
सत्काराला उत्तर देताना राजू ढगे भावूक झाले. "या संस्थेने मला काम करण्याची संधी दिली, हे माझे भाग्य आहे," अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध शाळांचे शिक्षक, कर्मचारी, नातेवाईक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राजू ढगे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बसवराज पाटील. सोबत बापूराव पाटील, व्यंकटराव जाधव व इतर मान्यवर.

Post a Comment

0 Comments