"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुरूम | प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रमात संशोधन प्रकल्प, फिल्ड प्रोजेक्ट, ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) व इंटर्नशिपचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या घटकांचा प्रभावी वापर करून उद्योग-व्यवसाय व करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण कक्ष, वाणिज्य संशोधन केंद्र, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, करिअर कट्टा तसेच पुणे येथील ENSIN फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी “AI in Research Design, Creativity, Innovation and Entrepreneur” या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेअंतर्गत ‘आयडियाथॉन’ संकल्पनेवर आधारित पोस्टर, मॉडेल, डेमो व प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांच्या हस्ते होणार असून भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल शिवाजीराव मोरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी मा. आश्लेष भैय्या मोरे, मा. जनार्दन साठे, मा. पद्माकरराव हराळकर, डॉ. सुभाष वाघमोडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यशाळेत पुणे येथील पुष्कराज ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर शैलेन्द्र गोस्वामी हे “संशोधन आराखड्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ. सय्यद अझरुद्दीन (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांचे नवीन शैक्षणिक धोरण व जागतिक परिस्थितीत उद्योजकतेच्या संधी या विषयांवर दोन सत्रे होणार आहेत. याशिवाय डॉ. शैलेश वादेर व प्रा. शिवकुमार दिनी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधून “स्टुडंट इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड” व संशोधक विद्यार्थ्यांसाठी “रिसर्च स्कॉलर इनोव्हेटिव्ह आयडिया अवॉर्ड” प्रदान करण्यात येणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच पीएचडी संशोधकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले व संयोजन समितीने केले आहे.
0 Comments