"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
उन्हाळ्याच्या कडक दिवसांत निसर्गातील पक्ष्यांवर दया दाखवत कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे.
तुळजापूर तालुक्यातील नांदुरी केंद्राअंतर्गत येणाऱ्या कदमवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांच्या चारा व पाण्याची सुंदर व्यवस्था करून पर्यावरणप्रेमाचा आदर्श घालून दिला आहे.
विद्यार्थ्यांनी मातीची मडकी, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास तसेच इतर उपलब्ध साहित्याचा वापर करून पक्ष्यांसाठी पाणी व चारा ठेवण्याच्या विविध वस्तू तयार केल्या. या वस्तूंमध्ये धान्य व पाणी भरून त्या शाळेच्या आवारातील विविध झाडांवर लटकवण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक पक्षी येथे येऊन पाणी व चारा घेत आहेत.
कदमवाडी हे गाव सांप्रदायिक सलोखा जपणारे असून येथील विद्यार्थ्यांमध्येही प्राणीमात्रांप्रती दया, प्रेम आणि आपुलकीची भावना दिसून येते. या भावनेतूनच विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाचे गावातील पालक तसेच शाळेचे मुख्याध्यापक घोडके डी.टी. यांच्यासह शिक्षक वर्गातून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना या कार्यासाठी शाळेतील शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले आहे.
0 Comments