Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

देवकुरुळीत ‘भक्ती संध्या’ रंगली; सुरावलींनी रसिक मंत्रमुग्ध

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
अध्यात्म आणि संगीताचा सुरेख संगम साधत तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथे आयोजित करण्यात आलेली ‘भक्ती संध्या’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अभंग, गवळण आणि भक्तीगीतांच्या अवीट सुरावलींनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. श्री. व्यंकटेश संगीत विद्यालय सोलापूर, देवकुरुळी ग्रामस्थ आणि एस.के.जी. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक हनुमान मंदिरात करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्री. व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संचालक संदीप कुलकर्णी, भानुदास ईरकशेट्टी, उमाशंकर पाटील, अरुणा गुजर आणि अर्चना माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीच्या पूजनाने झाली. यावेळी संदीप कुलकर्णी (सोलापूर), सामाजिक कार्यकर्ते हेमंत वडणे (लातूर) आणि पखवाज वादक कु. विनायक जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वराभिषेकाने रसिक न्हाले
गायिका अर्चना माने यांनी ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे...’ या गणेशस्तवनाने मैफिलीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर सतीश महामुनी सर आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी ‘अच्युतम केशवम...’ हे भजन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मैफिलीत सादर झालेली ‘अंजनीच्या सुता...’, ‘कानडा राजा पंढरीचा...’, ‘श्री स्वामी समर्थ...’ ही भक्तीगीते आणि ‘बाजाराला विकण्या निघाली...’ ही गवळण रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. अरुणा गुजर, उमाशंकर पाटील, वरद कुलकर्णी आणि श्रीकांत सुतार यांनी आपल्या सुमधुर गायनाने मैफिलीत रंग भरला. कार्यक्रमाची सांगता वरद कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘आगा वैकुंठाच्या राया...’ या भैरवीने झाली.

तरुणाईत संगीताची ओढ निर्माण करण्याचा मानस
ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि तरुण पिढीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत आणि भक्ती संगीताचा प्रसार व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे एस.के.जी. फाऊंडेशनचे संस्थापक शिवाजी नरुणे यांनी सांगितले.

या मैफिलीला वाद्यांची साथही तितकीच प्रभावी लाभली यामध्ये प्रामुख्याने सिंथेसायझर : संदीप कुलकर्णी,हार्मोनियम : उमाशंकर पाटील,
तबला व ढोलकी : भानुदास ईरकशेट्टी, ऑक्टोपॅड : विनायक नाईकनवरे यांची साथ लाभली.

रसिक श्रोत्यांची मांदियाळी
या भक्ती सोहळ्यासाठी देवकुरुळीसह काटगाव, धोत्री, पिंपळा, तामलवाडी, चव्हाणवाडी या परिसरातील संगीतप्रेमी, भाविक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश महामुनी यांनी केले, सूत्रसंचालन अरुणा गुजर यांनी केले, तर डी. के. दशरथ यांनी आभार मानले. गावचे भजनी मंडळ, माजी विद्यार्थी मंडळ आणि ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

✍️'Only न्युज धाराशिव' – जिल्ह्यातील घडामोडींचा अचूक वेध!

Post a Comment

0 Comments