"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान (सोलापूर) संचलित तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल येथील इयत्ता पाचवीच्या दोन विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शिष्यवृत्ती मिळवली आहे. यामध्ये ज्ञानेश्वरी दत्ता भोजने आणि आई-वडिलांचे छत्र हरवलेला शिणू कलमुळे या दोन होतकरू विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'गुणवत्ता अभियाना'ला यश
यावर्षी एकलव्य विद्या संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष पावले उचलण्यात आली होती. इतर मागास बहुजन कल्याण विभाग (लातूर) चे उपसंचालक तेजस माळवदकर व धाराशिवचे उपसंचालक अमोल ताकभाते यांच्या संकल्पनेतून, तसेच संस्थेचे कार्यवाह विवेक अयाचित यांच्या सूचनेनुसार संकुलात 'गुणवत्ता अभियान' राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळेच या दोन्ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्रतेपर्यंत मजल मारली आहे.
विशेषतः आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या शिणू कलमुळे याने परिस्थितीशी दोन हात करत मिळवलेले हे यश इतरांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे.
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
ज्ञानेश्वरी आणि शिणू यांच्या या यशाबद्दल भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर आणि कार्यवाह विवेक अयाचित यांनी आनंद व्यक्त केला आहे.
तसेच संस्थेचे संचालक नरेश पोटे, अशोक संकलेच्या, अभय कुलकर्णी, डॉ. प्रणिता गडेकर, ॲड. जनक पाटील, ॲड. प्रदीपसिंह राजपूत, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर व संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments