Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खाकीतील कवी: शिपाई ते कॅप्टन... आणि २० हजार कवितांचा प्रवास! कॅप्टन नरेंद्र कुमार सिद्धू यांची 'शौर्यगाथा'

मुरुम | विशेष प्रतिनिधी
'जय जवान, जय किसान' हा नारा आपण सर्वांनी ऐकला आहे, पण तो आयुष्यात प्रत्यक्षात जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलाचे निवृत्त कॅप्टन नरेंद्र कुमार सिद्धू. गरिबीच्या झळा सोसत सैन्य दलात शिपाई म्हणून भरती झालेला हा योद्धा आज आपल्या लेखणीने आणि माणुसकीने समाजमनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची ही थक्क करणारी कहाणी.

जिद्दीचा प्रवास: कारखान्यात नाकारले, सैन्याने स्वीकारले!
मेरठ जिल्ह्यातील छबडिया येथील रहिवासी असलेल्या नरेंद्र कुमार यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहानपणी अनेक कारखान्यांमध्ये कामासाठी विचारणा केली, पण वय कमी असल्याने त्यांना काम नाकारण्यात आले. मात्र, जिद्द न हारता त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि बारावीत असतानाच ते भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून भरती झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या लष्करी कारकिर्दीची आणि प्रशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) येथूनच झाली.

मैदानावर 'सुवर्णझेप' अन् कॅप्टन पदाला गवसणी
केवळ सीमेवरच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही त्यांनी सैन्य दलाची मान उंचावली. 'ऑल इंडिया सर्व्हिसेस'मध्ये गोळाफेक (Shot Put) खेळात त्यांनी तब्बल ११ वेळा सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या याच शिस्तीचा आणि कष्टाचा सन्मान म्हणून सैन्य दलाने त्यांना पदोन्नतीने सुभेदार मेजर आणि त्यानंतर सन्माननीय 'कॅप्टन' पदाने गौरविले.

माणुसकीचा 'रक्षक': जंगलातील तो थरार...
कॅप्टन सिद्धू केवळ शिस्तीचे भोक्ते नाहीत, तर ते तितकेच हळव्या मनाचे आहेत. त्यांच्या सेवाकाळातील एक प्रसंग आजही अंगावर शहारे आणतो. झाशी-बबीना प्रवासादरम्यान रात्री घनदाट जंगलात त्यांची रिक्षा बंद पडली. हिंस्र श्वापदांची भीती असताना इतर प्रवाशांनी पळ काढला, मात्र ड्रायव्हरला एकटे सोडणे कॅप्टनच्या तत्त्वात बसत नव्हते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते रात्रभर त्या ड्रायव्हरच्या सोबतीला जंगलात उभे राहिले आणि आपला 'रक्षक' धर्म निभावला.

लेखणीची कमाल: २० हजार कवितांचा विक्रम!
२००९ मध्ये सैन्य दलातून निवृत्त झाल्यावरही त्यांचे कार्य थांबलेले नाही. सध्या एका साखर कारखान्यात 'मुख्य सुरक्षा अधिकारी' म्हणून कार्यरत असलेले ६२ वर्षीय सिद्धू आजच्या तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने वावरतात. त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची 'लेखणी'. त्यांनी आतापर्यंत २० ते २५ हजार गीते आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून, 'शौर्यगाथा' या पुस्तकाला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

जागतिक स्तरावर 'सिद्धू' नावाचा डंका
कॅप्टन सिद्धू यांच्या कार्याची दखल सातासमुद्रापार घेतली गेली आहे. त्यांना आतापर्यंत ७३ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

नासा (NASA): नासाकडून बोर्डिंग पास आणि अंतराळात विशेष परिचय.

भारतीय टपाल विभाग: त्यांच्या नावाचे व फोटोचे विशेष तिकीट प्रसिद्ध.

आंतरराष्ट्रीय सन्मान: ऑस्ट्रेलियातील ग्रिफीथ युनिव्हर्सिटीसह थायलंड, इराक आणि इंडोनेशिया या देशांकडून विशेष गौरव.

"जेवताना शेतकऱ्याची आणि झोपताना सैनिकाची आठवण काढावी," असा मोलाचा संदेश देणारे कॅप्टन नरेंद्र कुमार सिद्धू हे आजच्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने 'रोल मॉडेल' ठरले आहेत.

शब्दांकन:
प्रो. डॉ. महेश मोटे
मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव

Post a Comment

0 Comments