Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
कळंब | लेखक प्रा. डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी
महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक पटलावर ज्या काही निवडक विचारवंतांनी व ज्ञानतपस्वींनी अपार निष्पेक्षतेने कार्य केले, त्यात ज्ञानदेव भाऊराव मोहेकर (आण्णा) यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्याच्या दलदलीत सापडलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या या मूल्यशिक्षणाच्या प्रेरकाची आज (२७ जुलै २०२६) ९९ वी जयंती.
तुळजाभवानी मातेच्या पावन धाराशिव जिल्ह्यातील मोहा या छोट्याशा गावात २७ जुलै १९२७ रोजी एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात आण्णांचा जन्म झाला. कौटुंबिक परिस्थिती बिकट आणि निरक्षरता असतानाही, मुलाने शिकून घराचा उद्धार करावा या उदात्त ध्येयाने आईने विकत घेतलेल्या एका समईच्या प्रकाशात त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची पायाभरणी झाली. अडीच वर्षांचे असतानाच आईचे छत्र हरपले; मात्र वडिलांचे धार्मिक व परोपकारी संस्कार त्यांच्या पाठीशी राहिले. परिस्थितीवर मात करत त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बी.एस्सी. (कृषी) ही पदवी मिळवली. उच्च पदाची नोकरी किंवा परदेशवारीचा मोह टाळून त्यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक परिवर्तनालाच आपले जीवनध्येय मानले.
‘ज्ञानदीप लावू जगी’: येरमाळ्यात रोवलेली शिक्षणसंस्थेची पायाभरणी
चिनी विचारवंत म्हणतात, "पिढ्यानपिढ्यांची तरतूद करायची असेल तर माणसे पेरा." याच तत्त्वावर चालत अण्णांनी २५ सप्टेंबर १९५१ रोजी येरमाळा (ता. कळंब) येथे 'ज्ञान प्रसारक मंडळ' या शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेचे बोधचिन्ह 'समई' तर बोधवाक्य संत नामदेवांचे 'ज्ञानदीप लावू जगी' असे निश्चित करण्यात आले.
महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वि. रा. शिंदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत त्यांनी 'कमवा व शिका' या योजनेअंतर्गत १९५४ मध्ये 'ज्ञानोद्योग विद्यालय' सुरु केले. पुढे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण मिळावे म्हणून १५ जून १९६९ रोजी कळंब येथे महाविद्यालयाची स्थापना केली (जे आज 'शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय' म्हणून ओळखले जाते).
"इवलेसे रोप लावियेले द्वारी I त्याचा वेलू गेला गगनावरी"
आण्णांच्या या शैक्षणिक यज्ञामध्ये त्यांच्या धर्मपत्नी कै. सुमनबाई मोहेकर यांचेही तितकेच मोलाचे योगदान राहिले. आज या संस्थेचा अमृत महोत्सव (२०२६-२७) साजरा होत असून, कळंब, वाशी, परंडा, औसा व लातूर यांसारख्या विविध ठिकाणी १ वरिष्ठ महाविद्यालय, ४ कनिष्ठ महाविद्यालये, १० माध्यमिक व २ प्राथमिक विद्यालयांसह वसतिगृहे आणि पतसंस्थांचा वटवृक्ष विस्तारला आहे. २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार सुमारे ७४६ कर्मचारीवृंद या वटवृक्षाचे संगोपन करत आहेत.
त्यागाची परिसीमा अन् निःस्वार्थी समाजसेवा
सुरुवातीच्या काळात वसतिगृहातील मुलांच्या भोजनाची सोय व्हावी म्हणून अण्णा स्वतः गावोगावी फिरून धान्य गोळा करत. इतकेच नव्हे तर भल्या पहाटे उठून विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या हाताने भाजी-भाकरी तयार करत असत. अनवाणी पायाने रानोमाळ भटकून गुणवान गरीब मुलांचा शोध घेणे आणि त्यांना खांद्यावरून वसतिगृहात आणणे, हे अण्णांचे वेगळेपण होते. त्यांच्या या प्रामाणिक व निःस्वार्थ कारभारामुळेच गावकऱ्यांनी त्यांची मोहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड केली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
अण्णांच्या या अलौकिक कार्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. अमेरिकेच्या मिस न्यूमन यांनी संस्थेला भेट देऊन कौतुक करत देणगी दिली, तर १९९० मध्ये सांगलीच्या राजमाता नेमगोंडा पाटील ट्रस्टतर्फे त्यांना 'जनसेवा पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.
३० ऑगस्ट १९९१ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी या ज्ञानतपस्वीने जगाचा निरोप घेतला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा आदर्श जपणारे, पदामुळे नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे झालेले शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त 'Only न्युज धाराशिव' परिवाराकडून विनम्र अभिवादन!
–लेखक प्रा. डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी
(मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब)
0 Comments