"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या मंगरूळ यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील 'एकलव्य विद्या संकुला'तील तीन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्या संकुलाच्या गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शासनातर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत सातवीच्या वर्गातील गणेश शिंदे व साक्षी धुरपडे या दोन विद्यार्थ्यांनी, तर चौथीच्या वर्गातील विनोद अनिल कांबळे या विद्यार्थ्याने उत्तम गुण मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरण्याचा पराक्रम केला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे यमगरवाडी परिसर आणि शिक्षण वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुणवत्ता आणि जिद्दीचा संगम
"योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये अफाट बुद्धिमत्ता असते, तिला योग्य दिशा देण्याचे काम संकुल करत आहे," असा विश्वास संस्था प्रशासनाने व्यक्त केला.
सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर आणि कार्यवाह विवेक आयाचित यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे (लातूर) प्रादेशिक उपसंचालक तेजस माळवदकर, धाराशिवचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते, संस्थेचे सदस्य अशोक संकलेचा, कोंडीबा देवकर, फुलाजी ताटी-कुंडलवार, अशोक बनकर, संतोष बनसोडे, गोविंद सोमानी, लक्ष्मी पवार, संगीता पाचंगे, गणेशराव झळके, सौ. सुशीला ओक (छत्रपती संभाजीनगर), खंडू काळे, माधव पाटील, मयूर अंतरेड्डी, अण्णासाहेब मगर, दयानंद भडंगे, हरीश मगदूम, प्रणिता शेटकार, विठ्ठल म्हेत्रे आणि अण्णासाहेब कोल्हटकर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments