Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विद्यार्थ्यांची हेळसांड थांबवा! तुळजापूर-शेळगाव एसटी बस दुपारी ३:३० वाजता सोडण्याची प्राचार्यांची आगारप्रमुखांकडे पत्राद्वारे मागणी

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी / उमाजी गायकवाड 
तुळजापूर आगारामधून सुटणारी तुळजापूर ते बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) ही दुपारची बस वेळेवर आणि लवकर सोडण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी मोठी गैरसोय व हेळसांड थांबेल, अशी आग्रही मागणी शेळगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यांनी तुळजापूरच्या आगारप्रमुखांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ही एसटी बस सध्या ४ वाजता सुटते. एसटी बस दुपारी ठीक ३:३० वाजता सोडल्यास विद्यार्थ्यांना वेळेत शाळा सुटण्याच्या वेळी गावात पोहोचणे सोयीचे होईल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेळगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयात दहिवडी, काटी, काटी तांडा, सावंतवाडी यांसारख्या विविध ग्रामीण गावांमधून दररोज ५० ते ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी केवळ एसटी बसच्या प्रवासावर अवलंबून असतात.

सध्या ही बस तुळजापूर आगारामधून दुपारी अत्यंत उशिरा सुटत असल्यामुळे, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामुळे रात्री उशिरा घरी पोहोचावे लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

जर ही बस तुळजापूर येथून दुपारी ३:३० वाजता सोडली, तर ती शेळगाव (आर) येथे पोहोचून तेथून पुन्हा सायंकाळी ५:०० वाजता परतीचा प्रवास करू शकते. यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत ताळमेळ बसून विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाचेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा आणि सुरक्षिततेचा विचार करून आगारप्रमुखांनी यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन बसची वेळ बदलून द्यावी, अशी तीव्र मागणी संस्था, प्राचार्य आणि परिसरातील पालकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments