'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
मंगरूळ -यमगरवाडी येथील 'एकलव्य विद्या संकुल'मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' अशी गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कोंडीबा देवकर उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या संघर्षमय जीवनावर व उत्तुंग कर्तृत्वावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंच्या अथांग साहित्यसंपदेचा परिचय करून देत त्यांनी, "अण्णाभाऊंचे साहित्य हे समाजातील शोषितांना आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणारे मुख्य व्यासपीठ ठरले," असे प्रतिपादन केले.
'लेखन प्रेरणा दिवस' आणि विशेष उपक्रम
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आता 'लेखन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या वतीने विद्या संकुलातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष 'लेखन उपक्रमा'चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची आणि लिहिण्याची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद नियोजन
या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी सूरजित जाधव, विश्वजीत यमगर, सोहम वाघमारे, स्नेहल यमगर आणि पार्वती मारकड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्वती मारकड हिने आपल्या ओघवत्या शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार इयत्ता ५ वी मधील बालकलाकार शिनू कलमुळे याने मानले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments