'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) हे आजोळ असलेल्या आणि सध्या पिंपरी-चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या कुमारी श्रेया मिलिंद दंडे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मलेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. श्रेयाने स्टिक फाईट या प्रकारात सुवर्णपदक, तर काठी फिरवण्याच्या प्रकारात कांस्यपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली.
मलेशियात पार पडलेल्या या स्पर्धेत सुमारे बारा देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्टिक फाईट हा प्रकार प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये लोकप्रिय असून, या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या श्रेयाने मिळविलेले सुवर्णपदक विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
श्रेया हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केले. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही तिने ध्येयापासून माघार न घेता सराव आणि मेहनतीच्या जोरावर आपली वाटचाल सुरू ठेवली. मलेशियातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक खर्चासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवाराने आर्थिक मदतीचा हात दिला.
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळविलेल्या श्रेयाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. सांगवी (काटी) या ग्रामीण भागाशी नाते असलेल्या या कन्येने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
श्रेया हिला स्पर्धेसाठी संजय बनसोडे, स्मिता धिवर तसेच तिची आई सीमा मिलिंद दंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन होत आहे.
0 Comments