Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

‘एसटी महामंडळ विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रमाला तामलवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी जाणून घेत बसफेऱ्या वाढवण्याचे आगार प्रमुखांचे आश्वासन


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील सरस्वती विद्यालय, तामलवाडी येथे तुळजापूर आगारातर्फे 'एसटी महामंडळ विद्यार्थ्यांच्या दारी' हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्या थेट जाणून घेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य सुहास वडणे व पर्यवेक्षक महादेव मसुते यांच्या हस्ते तुळजापूर आगाराचे प्रमुख रामपुरे साहेब, आगार सहाय्यक बामनकर साहेब, संस्थेचे संचालक नागनाथजी मसुते आणि एसटी वाहक विष्णू माळी यांचे स्वागत करण्यात आले.

खेड्यापाड्यांत शिक्षणाची गंगा पोहचवण्यात एसटीचा मोठा वाटा
प्रास्ताविक करताना प्राचार्य सुहास वडणे यांनी महामंडळाच्या योगदानाचा गौरव केला. पांगदरवाडी, गंजेवाडी, सांगवी काटी, मुक्ती नगर, माळुंब्रा, सुरतगाव आणि मसला यांसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थी केवळ एसटीच्या सुविधेमुळेच विद्यालयात शिक्षण घेऊ शकत आहेत, असे त्यांनी नमूद केले. विशेषतः विद्यार्थिनींसाठी असलेल्या मोफत पास योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला मोठी चालना मिळाली असून, या पवित्र कार्यात एसटी महामंडळाचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत प्राचार्यांनी आगार प्रमुखांचे आभार मानले.

इतर गावांमध्येही लवकरच बसफेऱ्या सुरू करणार
अध्यक्षीय भाषणात आगार प्रमुख रामपुरे यांनी विद्यार्थ्यांना महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना वेळेवर व मोफत बससुविधा मिळावी यासाठी प्राचार्य वडणे यांनी सातत्याने केलेल्या पत्रव्यवहाराचे आणि परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच येत्या काळात पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द व देवकुरळी या गावांतील विद्यार्थ्यांसाठीही अतिरिक्त बसफेऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राऊत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्वामी यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments