Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दानपेटीपेक्षा ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा; 'झोपडपट्टी सुरतगाव' जि. प. शाळेचा बदलला चेहरामोहरा!इस्लामी सोशल मीडिया फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; आकर्षक रंगरंगोटीने शाळा झाली बोलकी!

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाचा वसा जपत 'इस्लामी सोशल मीडिया फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने एका कौतुकास्पद उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या पुढाकारातून तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झोपडपट्टी सुरतगाव या शाळेची अत्यंत आकर्षक आणि बोलकी रंगरंगोटी करण्यात आली असून, यामुळे शाळेचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून गेला आहे. नव्याने सजलेल्या या डिजिटल आणि शैक्षणिक स्वरूपातील शाळेचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष पैगंबर शेख, मुख्याध्यापक जवळगावकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली गुंड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या जिल्हा परिषद शाळेत सध्या ३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या सुशोभीकरणासाठी आणि रंगरंगोटीसाठी व्यवस्थापनाकडून फाउंडेशनकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेने संपूर्ण शाळेला एक नवे, आकर्षक रूप दिले आहे.

भिंतींवर अवतरले शैक्षणिक विश्व!
शाळेच्या भिंतींवर बालसुलभ चित्रे, अक्षरे, अंक, विविध विषयांशी संबंधित शैक्षणिक घटक, प्रेरणादायी संदेश आणि आकर्षक रंगीत कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. यामुळे वर्गांचे वातावरण अधिक आनंददायी, प्रेरणादायी आणि विद्यार्थीकेंद्रित बनले आहे. या दृश्यात्मक  बदलांमुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि शिकण्याची आवड वाढण्यास मोठी मदत होणार आहे. सुंदर आणि रंगीबेरंगी वातावरणामुळे मुलांची शाळेकडे ओढ वाढेल, असा विश्वास यावेळी शिक्षकांनी व्यक्त केला.

"आजच्या काळात आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा ज्ञानमंदिरासाठी खर्च करणे ही काळाची गरज आहे. मंदिरातील दानपेटी भरण्यापेक्षा ज्ञानमंदिरातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या भविष्यात गुंतवणूक करणे हे अधिक पुण्याचे कार्य आहे. समाजातील प्रत्येकाने शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिल्यास एक सक्षम आणि सुजाण पिढी घडेल."
— पैगंबर शेख (अध्यक्ष, इस्लामी सोशल मीडिया फाउंडेशन)

ग्रामस्थ अन् शिक्षणप्रेमींची मोठी उपस्थिती
शाळेचा हा नवा लूक पाहण्यासाठी आणि कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मौसीन आत्तार, मेहबूब तांबोळी, सद्दाम शेख, महेश गुंड, रज्जाक अत्तार, रुबान शेख, सहशिक्षक विठ्ठल नरवडे, हर्षवर्धन माळी, तुकाराम वाडकर, श्रीमती आडम यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments