धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
खरीप हंगामाचे नियोजन, पिकांचे व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिंगोली येथे ‘खरीप शेतकरी मेळावा’ उत्साहात पार पडला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, धाराशिवच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिंगोली येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, ग्रामपंचायतजवळ झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शासकीय कृषी महाविद्यालय, धाराशिवचे प्रभारी प्राचार्य तथा मृदाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एम. एस. वाघमारे होते. कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर येथील वनस्पतीशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे आणि कृषिविद्या विषय विशेषज्ञ प्रा. अपेक्षा कसबे यांनी शेतकऱ्यांना खरीप पिकांचे नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
खरीप पिकांच्या नियोजनापासून ते कीड-रोग नियंत्रणापर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिल्याने शेतकऱ्यांसाठी हा मेळावा मार्गदर्शक ठरला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य पीक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
मेळाव्यास उपसरपंच मनोज मगर, ग्रामविकास अधिकारी संदीपान लोमटे, शेतकरी प्रतिनिधी रणजीत पडवळ आणि गणेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम समन्वयक डॉ. के. एस. थोरात, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. ए. पाटील आणि डॉ. ए. व्ही. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कृषी महाविद्यालयातील कृषीदूत व कृषिकन्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याच्या आयोजनाबद्दल ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे आभार मानले.
0 Comments