Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात पदवीचे बळ; मुरूमच्या माधवराव पाटील महाविद्यालयात पदवीदान सोहळा उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण; गुणवंत प्राध्यापकांचा गौरव, विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचा संदेश


मुरूम | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संलग्नित आणि नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ मंगळवारी (ता. ११) उत्साहात पार पडला. विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. अंकुश कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, नगरसेवक गणेश अंबर, सूर्यकांत जाधव, डॉ. सतीश शेळके, प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विशेष कामगिरीबद्दल मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर तसेच प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. शरण पाटील यांची नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूमच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच डॉ. नितीन हुलसुरे आणि डॉ. पंकज पाताळे यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

यानंतर बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.एस., एम.ए. आणि एम.एस्सी. या विविध अभ्यासक्रमांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पदवी हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले.

व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस असून, तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी स्वावलंबी आणि गुणवत्तापूर्ण बनावे, यासाठी संस्थेची निरंतर वाटचाल सुरू असल्याचे शरण पाटील यांनी सांगितले.

विद्यापीठाने २०१७ पासून महाविद्यालयांमध्येच पदवीदान समारंभ घेण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याचे सांगून प्रा. डॉ. अंकुश कदम यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेकी वापर टाळण्याचा, विविध कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि प्राप्त पदवीचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले. पदवीदान समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड आणि परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरसिंग कदम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले, तर डॉ. राम बजगिरे यांनी आभार मानले. समारंभास महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरूम, ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात विविध शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करताना मान्यवर.

Post a Comment

0 Comments