'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
मुरुम | प्रतिनिधी
दि. १४ ऑगस्ट:
शहरात राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (ता. १३) काढण्यात आलेल्या भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि देशप्रेमाची भावना मनात जागवत मुरुम शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील ६ हजारांहून अधिक विद्यार्थी, माजी सैनिक, राजकीय पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक या रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीच्या या शिस्तबद्ध आणि भव्य आयोजनामुळे संपूर्ण मुरुम शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
नगरपरिषद कार्यालयापासून रॅलीचा दिमाखात प्रारंभ
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात मुरुम नगरपरिषद कार्यालयापासून अत्यंत उत्साही वातावरणात झाली. हातात मानाचा तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणा देत विद्यार्थी आणि कार्यकर्ते मार्गस्थ झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत ही भव्य रॅली महात्मा बसवेश्वर चौक येथे पोहोचली. या ठिकाणी राष्ट्रध्वजाला सन्मानाने मानवंदना देण्यात आली, तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अत्यंत भावूक वातावरणात आदरांजली वाहण्यात आली.
विविध शाळा-महाविद्यालयांची लक्षवेधी उपस्थिती
या ऐतिहासिक तिरंगा रॅलीत शहरातील शैक्षणिक संस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये:
श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी,प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यालय,नूतन प्राथमिक शाळा आणि डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल,जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक व मुलांची शाळा,
नगर परिषद शाळांसह विविध विद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद हजारोच्या संख्येने उपस्थित होते. रॅलीमध्ये काही बालचमूंनी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
देशभक्तीचा अनोखा संदेश देणाऱ्या या रॅलीला अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव गुरुजी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, श्रीराम नाडे, माजी सैनिक राजेंद्र बेंडकाळे, व्यंकट चौधरी, हनुमंत दुधगे, राजकुमार हिरेमठ, गुलाब अंबुसे, गटनेते गणेश अंबर, डॉ. सतीश शेळके, प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. महेश्वर होगाडे, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, मुख्याध्यापिका खतीब सय्यदा खुतेजा बेगम, अनुराधा जोशी, विजयकुमार देशमाने, दयानंद पाटील, राजशेखर कोरे, उपप्राचार्य उमाकांत महामुनी, सुभाष राठोड, सोनाली कलशेट्टी यांच्यासह मुरुम शहरातील सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीच्या निमित्ताने मुरुम शहरात अभूतपूर्व देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक एकोपा पाहायला मिळाला. या ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजनाचे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात कौतुक होत आहे.
0 Comments