तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर तालुक्यातील मंगरूर जिल्हा परिषद गटातील प्राथमिक शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत, शाळांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमाताई भैरवनाथ माडजे (रोचकरी) यांनी लावून धरली होती. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने (प्राथमिक) या संदर्भात तातडीने पावले उचलली आहेत. या कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट आदेश गट शिक्षणाधिकारी (पंचायत समिती, तुळजापूर) यांना देण्यात आले आहेत.
काय आहेत प्रस्तावित कामे?
मंगरूर गटातील जि. प. प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सौ. सीमाताई माडजे यांनी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र खंदारे यांनी संबंधित शाळांच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात खालील कामांचा समावेश आहे:
जि. प. प्राथमिक शाळा जकणी तांडा येडोळा: दोन नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम (मृदा व जलसंधारण मंत्री मा. ना. संजय राठोड यांच्या शिफारशीनुसार).
जि. प. शाळा नळदुर्ग: शाळेस मुख्य गेट बसवणे.
जि. प. प्राथमिक शाळा तीर्थ (बु.): नवीन वर्ग खोलीचे बांधकाम.
जि. प. प्राथमिक शाळा बिजनवाडी: शाळा दुरुस्ती व नूतनीकरण.
जि. प. प्राथमिक शाळा कुंभारी: शाळा दुरुस्तीचे काम.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तातडीने निधी देण्याची मागणी
"ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. शाळा दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्यांची कामे अत्यंत महत्त्वाची असून, यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. शिक्षण विभागाने या प्रस्तावांवर सकारात्मक पावले उचलल्यामुळे लवकरच या कामांना सुरुवात होईल," असा विश्वास जि. प. सदस्या सौ. सीमाताई माडजे यांनी व्यक्त केला.
शिक्षण विभागाने दिलेल्या या सकारात्मक आदेशामुळे मंगरूर गटातील जकणी तांडा, नळदुर्ग, तीर्थ (बु.), बिजनवाडी व कुंभारी येथील ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मंगरूर गटातील शाळांचे भाग्य उजळणार!
जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे-रोचकरी यांच्या मागणीला यश.
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु.), बिजनवाडी, कुंभारी, नळदुर्ग आणि जकणी तांडा येडोळा येथील शाळांच्या दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसाठी रीतसर प्रस्ताव सादर करण्याचे शिक्षणधिकाऱ्यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश!
0 Comments