'ओन्ली न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
भटके विमुक्त समाजातील मुलांनी केवळ शिक्षण घेऊन थांबायचे नाही, तर आपल्या समाजाच्या व्यथा-वेदना जाणून घेत मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करायला हवी. शिक्षणाच्या माध्यमातूनच आत्मभानाची पेरणी होते आणि यातूनच उज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवली जाते, असा सूर यमगरवाडी येथील 'एकलव्य विद्या संकुला'त पार पडलेल्या दोन दिवशीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिरात उमटला.
भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने मंगरूळ यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथे आयोजित या शिबिरात ३० मुली आणि २६ मुले अशा एकूण ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात विविध विषयांवरील आठ सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देत त्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचण्यात आला.
सक्रिय सहभागातूनच व्यक्तिमत्व घडते : सतीश खोपडे
शिबिराचे औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी मुख्याध्यापक सतीश खोपडे यांच्या हस्ते पार पडले. आपल्या उद्घाटनात्मक भाषणात खोपडे सर म्हणाले, "केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे विकास नव्हे. विद्यार्थ्यांनी अशा शिबिरांमध्ये मनापासून व सक्रिय सहभाग नोंदवून आपल्यातील आत्मविश्वासाला पैलू पाडले पाहिजेत. हीच शिबिरे भविष्यातील खंबीर नागरिक घडवण्याचे व्यासपीठ ठरतात."
उद्घाटन सत्रानंतर हरीश मगदूम, यशवंत निंबाळकर आणि संगीता पाचंगे यांनी आनंददायी खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संकोच दूर करत शिबिरात उत्साह भरला.
इतिहासाची जाणीव अन् भविष्याची दिशा
शिबिराच्या विशेष सत्रात भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांनी 'भटके विमुक्तांची मांडणी' या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. समाजाची भूतकाळातील अवस्था, सोसलेल्या हालअपेष्टा आणि आजची स्थिती यावर प्रकाश टाकत त्यांनी, "आपल्या समाजातील प्रत्येक मुलाने उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या विकासाचे शिलेदार झाले पाहिजे," असे आवाहनात्मक प्रतिपादन केले.
याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथे पालावरील मुलांसाठी अभ्यासिका चालवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मेहता यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या अनुभवांतून विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास कशी धरावी, याचे थेट धडे मिळाले.
योग, अभ्यास कौशल्य अन् विचारमंथन
शिबिराच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात प्रणिता शेटकार आणि फुलाजी ताटीकुंडलवार यांनी घेतलेल्या योग व प्राणायाम सत्राने झाली. शारीरिक व मानसिक आरोग्याचा धडा घेतल्यानंतर, हराळी येथील तंत्रस्नेही शिक्षक अनिल कांबळे यांनी 'अभ्यास कौशल्य' या सत्रात पाठांतर, एकाग्रता आणि वेळेचे नियोजन यावर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यानंतर अण्णासाहेब कोल्हटकर यांनी घेतलेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आपले विचार रोखठोकपणे मांडले.
आपल्यातील सुप्त शक्तीचे जागरण करा : धनंजय माटेफळकर
समारोप सत्रात लातूर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते धनंजय माटेफळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले, "अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्तीचे जागरण होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाप्रती संवेदनशील व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे ही काळाची गरज आहे."
नियोजनाची भक्कम साथ
भटके विमुक्त विकास परिषदेचे संघटन मंत्री राहुलजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून या शिबिराची आखणी करण्यात आली होती. त्यांनी दोन्ही दिवस पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दयानंद भडंगे, संतोष बनसोडे, अण्णासाहेब मगर, प्रणिता शेटकार, संगीता पाचंगे आणि हरीश मगदूम यांनी गटप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.
प्रारंभी विठ्ठल म्हेत्रे यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील भूमिका विशद केली. तर हरीश मगदूम यांनी संपूर्ण शिबिराचे नेटके संचालन केले. सूत्रांची धुरा रूपाली गिरी व विद्यार्थ्यांनी समर्थपणे सांभाळली. याप्रसंगी बीड येथील अशोक रायते, जब्बार शेख यांसह अनेक मान्यवर, शिक्षक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments