'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे ‘सन ग्रुप इंडस्ट्रीज’ (१९९३ पासून कार्यरत) समूहाच्या वतीने नवनिर्मित ‘सन ॲग्रो इंडस्ट्रीज’ या ४० टन क्षमतेच्या अत्याधुनिक गूळ कारखान्याचा वास्तुशांती, मशनरी पूजन, ऊसाची मोळी पूजन व बॉयलर प्रदीपन सोहळा नवरात्रीच्या पावन पर्वावर अत्यंत उत्साहात पार पडला. विविध राजकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांच्या अलोट उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
कारखान्याचे चेअरमन सत्यजित उर्फ गजानन देशमुख यांच्या आजी श्रीमती विजयादेवी बाजीराव देशमुख व चुलती श्रीमती अश्विनी संजय देशमुख यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व पूजा-अर्चा करून सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी कारखान्याच्या मशनरीचे पूजन करून व ऊसाची मोळी चरकात टाकून गूळ निर्मितीच्या शुभारंभाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
प्रामाणिकपणा हाच खरा धर्म; --- दत्ता (भाऊ) कुलकर्णी
सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सिद्धीविनायक कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता (भाऊ) कुलकर्णी म्हणाले, "छोट्या आणि सुटसुटीत प्रकल्पांमुळे उद्योग व शेतकरी दोघेही समृद्ध होतात. जरी या प्रकल्पाची क्षमता ४० टन प्रतिदिन असली, तरी मोठे साखर कारखाने बंद झाल्यानंतर आणि सुरू होण्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येतो. वर्षातील ३६५ पैकी तब्बल २५० दिवस हा कारखाना सुरू राहू शकतो."
काटा मारण्याच्या अपप्रवृत्तीवर कडक शब्दांत ताशेरे ओढताना ते पुढे म्हणाले, "काटा मारून कमावलेला नफा हा तळतळाटाचा असतो. प्रामाणिकपणा हाच उद्योगाचा खरा धर्म आहे. सन ॲग्रोचे ओव्हरहेड खर्च कमी असल्याने ते इतर मोठ्या कारखान्यांपेक्षा शेतकऱ्यांना निश्चितच दोन रुपये जास्त भाव देऊ शकतात. त्यांनी भारतीय जनता पार्टी व सिद्धीविनायक परिवाराकडून या नवीन प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा दिल्या!"
"तुळजापूर तालुक्यातील काटी येथे नवरात्रीच्या पावन पर्वावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 'सन ॲग्रो इंडस्ट्रीज'च्या वास्तुशांती व बॉयलर प्रदीपन सोहळ्यात चरकात ऊसाची मोळी टाकून गाळपाचा शुभारंभ करताना मान्यवर."
पुण्यात हेल्पर ते साम्राज्य विस्तार: अमरसिंह देशमुख यांचा भावनिक प्रवास
प्रास्ताविकात समूहाचे सर्वेसर्वा तथा मुख्य मार्गदर्शक अमरसिंह बाजीराव देशमुख यांनी आपल्या संघर्षाची गाथा मांडली. ते म्हणाले, "१९९३ मध्ये पुण्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हेल्पर व कारागीर म्हणून काम करताना मी उद्योगाचे धडे घेतले. अवघ्या १०×१० च्या खोलीतून सुरू झालेला हा प्रवास आज ग्राहक व शेतकऱ्यांच्या विश्वासावर धाराशिव, तुळजापूर, लातूर, कुर्डुवाडी, अंबाजोगाई, वैराग या ठिकाणी दालनांच्या रूपात विस्तारला आहे."
"आज १५० ते २०० कुटुंबांना रोजगार देण्याचे समाधान आमच्या पाठीशी आहे. आमच्या मूळ गावी काटी येथे स्थापन केलेल्या 'सन ॲग्रो इंडस्ट्रीज'मध्ये ऊसाचे योग्य वजन, रास्त भाव आणि तात्काळ बिल दिले जाईल. काटा मारणे हा प्रकार आमच्या रक्तामध्ये नाही," असे सांगतानाच, दोन वर्षांपूर्वी अचानक सोडून गेलेले धाकटे बंधू कै. संजय देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना सर्व देशमुख परिवार भावूक झाला होता.
"शेतकऱ्यांचा विश्वास हाच आमचा खरा पाया!"
--चेअरमन सत्यजित देशमुख
"सन ॲग्रो इंडस्ट्रीज ही केवळ एक व्यावसायिक संस्था नसून भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समृद्धीचे केंद्र बनेल. आम्ही पारदर्शक वजनकाटा, तात्काळ बिल आणि उच्चतम दर देण्यासाठी कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांनी विश्वासाने आपला ऊस कारखान्याकडे वर्ग करावा, त्यांच्या विश्वासाला कधीही तडे जाऊ दिले जाणार नाहीत."
— सत्यजित उर्फ गजानन देशमुख (चेअरमन, सन ॲग्रो इंडस्ट्रीज)
"ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा देणारा उपक्रम!"
"देशमुख बंधूंनी कठोर परिश्रम व प्रामाणिकपणाच्या जोरावर शून्य निर्मितीतून उद्योग साम्राज्य उभे केले आहे. काटीसारख्या ग्रामीण भागात गूळ कारखाना उभारल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 'सन ॲग्रो इंडस्ट्रीज'च्या माध्यमातून परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास वाटतो."
— ॲड. धिरज भैय्या पाटील (माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)
"स्थानिक तरुणांना रोजगार आणि शेतकऱ्यांना दिलासा!"
"सन ग्रुपने नेहमीच गुणवत्तेला आणि सामाजिक बांधीलकीला प्राधान्य दिले आहे. गूळ कारखान्यामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळण्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वेळेवर बिल मिळण्याची अडचण दूर होणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पास माझ्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!"
— विक्रमसिंह देशमुख (सभापती, पंचायत समिती, तुळजापूर)
"काटी गावाच्या वैभवात मानाचा तुरा रोहणारा प्रकल्प!"
"आमच्या काटी गावात 'सन ग्रुप'च्या वतीने सुरू झालेला हा ४० टन क्षमतेचा गूळ कारखाना म्हणजे गावकऱ्यांसाठी आणि परिसरातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी पर्वणीच आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहिलेले हे उद्योगविश्व संपूर्ण ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला नवी ऊर्जा देईल. शेतकऱ्यांना तात्काळ बिल, योग्य वजन आणि पारदर्शक कारभार देण्याचा या कारखान्याचा मानस कौतुकास्पद असून, ग्रामपंचायतीच्या वतीने या नाविन्यपूर्ण प्रकल्प्यास आणि देशमुख परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा!"
— सुजित भैय्या हंगरगेकर (सरपंच, काटी)
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी:
या सोहळ्यास भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष बोबडे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख, जि.प. सदस्य सुनिल बनसोडे, जि.प. सदस्य बाळासाहेब भाले, सरपंच सुजित हंगरगेकर, अभिजित गाटे (पोलीस), सरपंच गौरीशंकर कोडगिरे, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी जि.प. सदस्य राजकुमार पाटील, रामेश्वर तोडकरी, डॉ. जयसिंगराव देशमुख, ॲड. अविनाश देशमुख, सतीश देशमुख, रोहित पाटील,अनिल गुंड, करीम बेग, मकरंद देशमुख, प्रकाश गाटे, प्रदीप साळुंके, अहमद पठाण,चंद्रकांत काटे, जितेंद्र गुंड, भैरवनाथ काळे, अमोल गावडे, उद्योजक मोहन जाधव, रावसाहेब देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच देशमुख परिवारातील मार्गदर्शक अजयसिंह बाजीराव देशमुख, विजयसिंह बाजीराव देशमुख, अमरसिंह बाजीराव देशमुख, अभिजीत अजयसिंह देशमुख, विश्वजीत अजयसिंह देशमुख व कारखान्याचे चेअरमन सत्यजित उर्फ गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जुबेर शेख यांनी केले. सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी 'सन ग्रुप इंडस्ट्रीज'च्या वतीने महाप्रसादाची व स्नेहभोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
0 Comments