Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​मराठा समाजात 'उपवर मुलांचे संकट' गंभीर; अपेक्षांचे ओझे अन विषम स्त्री-पुरुष प्रमाणामुळे विवाह जुळणे आव्हानात्मक;​ धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाचा राज्यस्तरीय मेळावा; ९०० मुले अन अवघ्या ३०० मुलींची नोंदणी; पालकांमध्ये चिंतेचे ढग;​'मुला-मुलींना समजून घेण्यासाठी वेळ द्या, फसव्या टोळ्यांपासून सावध राहा'; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

"धाराशिव : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय महामेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. राणाजगजितसिंह पाटील, समवेत उपस्थित मान्यवर व हताश पालकांची गर्दी."

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​धाराशिव | उमाजी गायकवाड 
​बदलत्या सामाजिक-आर्थिक समीकरणांमुळे मराठा समाजात मुलांच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. वाढत्या अपेक्षा, शेती आणि ग्रामीण पार्श्वभूमीबद्दल निर्माण झालेली अनास्था, तसेच स्त्री-पुरुष प्रमाणातील तफावत यांमुळे शेकडो तरुण 'विवाह उत्सुक' असूनही स्थळ जुळत नसल्याचे विषण्ण करणारे वास्तव समोर आले आहे. धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकल मराठा समाज (मराठवाडा) आयोजित राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय महामेळाव्यात या सामाजिक समस्येची धग स्पष्टपणे जाणवली. या मेळाव्यात विवाहइच्छुक ९०० मुलांच्या तुलनेत अवघ्या ३०० मुलींची नोंदणी झाली असून, हताश आणि चिंतित पालकांची लागलेली विक्रमी उपस्थिती समाजासमोरील या गहन संकटाची साक्ष देत होती.

​या भव्य मेळाव्याचे उद्घाटन तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. भारत महाराज कोकाटे होते.

                   -आमदार राणाजगजितसिंह पाटील 
​
लग्नाची घाई नको; डिजिटल युगात संवादाला प्राधान्य द्या : आ. राणाजगजितसिंह पाटील
​विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, "आजकाल लग्न जुळवताना चर्चा अर्धवट राहतात. 'तुम्हीच बघा' म्हणून एकमेकांवर जबाबदारी टाकून मोकळे होण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या या आधुनिक युगात जग वेगाने बदलले आहे. अशा वेळी तरुण-तरुणींनी एकमेकांचे विचार, सवय आणि स्वभाव समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. घाईगडबडीत घेतलेले निर्णय भविष्यात घातक ठरू शकतात."

​'नवरी मिळवून देणाऱ्या' फसव्या टोळ्यांपासून सावध राहा!
​सध्याच्या हताश परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर भाष्य करताना आ. पाटील यांनी पालकांना सतर्कतेचा इशारा दिला. "मुलांची लग्ने जमत नसल्याने अनेक पालक मानसिक दडपणाखाली आहेत. याच लाचार परिस्थितीचा फायदा घेऊन ठराविक रक्कम उकळून लग्न लावून देणाऱ्या आणि नंतर फसवणूक करणाऱ्या दलाल टोळ्या राज्यभरात सक्रिय झाल्या आहेत. अनेक ठिकाणी यामुळे भयानक घटना घडल्या आहेत. पालकांनी कोणावरही आंधळा विश्वास न ठेवता, पूर्ण खात्री करूनच पुढचे पाऊल टाकावे," असे ते म्हणाले. तसेच, सामाजिक उधळपट्टी टाळण्यासाठी समाजाने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे, यासाठी आपण पूर्ण ताकदीने पाठिंबा देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

.           --भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे 

​'शेतकरी मुलगा नको' ही मानसिकता आणि जुन्या चुकांचे पातक!
​भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक नितीन काळे यांनी ग्रामीण भागातील वास्तव आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न अत्यंत परखडपणे मांडले. ते म्हणाले, "आज शेती आणि ग्रामीण भाग संकटात आहे. मेळाव्यात 'जनक' नावाचे एक शेतकरी आपल्या मुलासाठी स्थळ शोधायला आले होते. परंतु, मुलगा शेती करतो हे ऐकताच एकाही मुलीच्या पालकांनी पसंती दर्शवली नाही. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे शेतकरी युवक लग्नाविना राहण्याची वेळ आली आहे. १९९५ ते २००० च्या काळात समाजात घटलेल्या स्त्री-पुरुष दराच्या चुकांचे पातक आजच्या तरुणांना भोगावे लागत आहे. आज समाजात मुलांचे प्रमाण मुलींपेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे." दुष्काळाचे सावट असतानाही अशोकराव आणि त्यांची टीम सामाजिक बांधिलकीतून करत असलेल्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

.      --कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर 

बहुसंख्य समाजात वधू-वर मेळाव्यांची गरज ही शोकांतिका : उमेश राजेनिंबाळकर
​काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी सामाजिक परिस्थितीवर खंत व्यक्त केली. "महाराष्ट्र राज्यात मराठा समाज बहुसंख्य असूनही आज आपल्या मुला-मुलींचे विवाह जुळवण्यासाठी वधू-वर मेळावे आयोजित करावे लागत आहेत, ही एक मोठी सामाजिक शोकांतिका आहे. आज समाजात अत्यंत कर्तबगार आणि सुशिक्षित मुले-मुली आहेत; मात्र योग्य समन्वय नसल्याने प्रश्न चिघळत आहेत. वधू-वर सूचक समिती या दृष्टीने मोलाचे काम करत असून आम्ही या कार्यात पूर्ण ताकदीने सोबत राहू," असे त्यांनी स्पष्ट केले.

.                 --मुख्य संयोजक अशोक गायकवाड 

​'एक रुपयाही देऊ नका'; फसव्या एजंटांना थारा न देण्याचे अशोक गायकवाड यांचे आवाहन
​संयोजन समितीचे मुख्य सदस्य अशोक गायकवाड यांनी पालकांना मध्यस्थांच्या फसवणुकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. "सकल मराठा समाजाचा हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आणि निस्वार्थ भावनेने चालवला जातो. समाजहितासाठी आम्ही हे काम करतो. आजघडीला लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणारे भामटे आणि भुलथापा देणारे दलाल वाढले आहेत. पालकांनी अशा कोणालाही पैसे देऊ नयेत आणि फसव्या एजंटांपासून पूर्णपणे सावध राहावे," असे रोखठोक आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित पालकांना मोठा दिलासा मिळाला.

​'राज्यस्तरीय सामाजिक गौरव पुरस्कार २०२६' चे वितरण
​या कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा 'राज्यस्तरीय सामाजिक गौरव पुरस्कार २०२६' देऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

​पुरस्कारप्राप्त मान्यवर:
श्रीमती किरण निंबाळकर, श्री. भास्कर जाधव (दारफळ), श्री. अशोक ठोंबळ, श्री. राजु तांबे, श्री. हणुमंत भालेकर (तुळजापूर), श्री. गणपतराव गादगे (उदगीर), श्री. रमेश पवार (मुरूड), श्री. आण्णासाहेब कदम (आळणी), श्री. उमाकांत तपसाळे (उमरगा), ह.भ.प. श्री. पांडूरंग गरड महाराज, श्रीमती संगिता काळे, श्री. विश्वनाथ वाकुरे (तेर), श्री. प्रदिप तांबे (झरेगाव), श्री. अरूण मगर (पोलीस उपअधीक्षक, पुणे), श्री. उमाजी गायकवाड (तुळजापूर), ह.भ.प. श्री. मधुकर निंबाळकर महाराज, श्री. उमेशराजे निंबाळकर, श्री. बिभीषण मोरे, श्री. नवनाथ काळे, श्री. तानाजी बिरंजे, श्री. अशोक गायकवाड सर आणि श्री. नितीन काळे व श्री. किशोर जाधव.
​
या सोहळ्यात वधुवरांनी व पालकांनी प्रत्यक्ष आपला परिचय करून आप-आपला संपर्क क्रमांक सांगितला.

दुष्काळी परिस्थितीमुळे उपस्थित मान्यवरांचा सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पहार, पुष्पगुच्छ वगळून प्रत्येकी एक पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

या राज्यस्तरीय मेळाव्यास सकल मराठा समाजाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, राज्यभरातून आलेले वधू-वर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments