काटी/उमाजी गायकवाड
एकीकडे ग्रामीण भागातील शैक्षिणक सुविधा पुरविण्यावर शासन भर देत आहे. मोफत व सक्तीचे शिक्षण देत असताना मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता ज्या बाह्य वातावरणावर अवलंबून आहे. त्याच भौतिक सुविधा तुळजापूर तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत नसूनही मात्र येथील विद्यार्जन करणाऱ्या शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाची कास धरत प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय चिकाटीने,जिद्दीने ज्ञानार्जनाचे काम करीत येथील जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचवली आहे.
शाळेला सुस्थितीत इमारत नाही, विद्यार्थांना बसण्यासाठी धड बेंच व्यवस्थित नाहीत, वर्गखोल्या, शौचालय,शाळेच्या परिसर, मैदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी लागणारे शैक्षणिक वातावरणासह विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर बाह्य घटकांचा परिणाम करणार्या भौतिक सुविधा शाळेमध्ये उपलब्ध नाहीत. प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आणला परंतु या कायद्याची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याचे येथील भौतिक सुविधांच्या अभावामुळे प्रकर्षाने जाणवते.
सावरगाव येथील शिक्षकांनी मात्र या भौतिक सुविधा नसताना आहे त्या परिस्थितीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शाळा गुणवत्तेत अव्वल स्थानावर आणली आहे.
या प्रशालेचा दरवर्षी इयत्ता दहावीचा निकाल अव्वल असतो,एन.एम.एम.एस. जास्तीत जास्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,वकृत्व स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा,शालेय गणवेश, स्वयंशासन दिन, स्नेहसंमेलन
असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. 800 पटसंख्या असलेल्या या प्रशालेत इंग्रजी व विज्ञान विषयाचा माध्यमिक शिक्षक नाही हे विशेष आहे.
यंदा धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत तुळजापुर तालुक्यातून एकमेव सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेची शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी 4 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 2 ते 7 एप्रिल या 5 दिवसांच्या कालावधीत बडोदरा अहमदाबाद व स्टॅचु ॲाफ युनिटी (गुजरात) या ठिकाणी जाणाऱ्या शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी प्रगती ताटे, स्नेहा कुंभार, समर्थ तानवडे व सार्थक मांगले या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थांना सोलापूर येथील रेल्वे स्टेशनवर प्रशालेचे मुख्याध्यापक वाघ, सहशिक्षक गायकवाड, व्होनमुटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल पवार, रामेश्वर माळी यांनी पुष्पगुच्छ व पेढा भरवून निरोप देऊन शुभेच्छा दिल्या.
शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ज्या बाह्य वातावरणावर अवलंबून आहेत. त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात व शाळेचा आणखी विकास व्हावा यासाठी आमदार, खासदार, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती व स्थानिक गावपुढाऱ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments