Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव लोकसभा निवडणूक आख्याड्यात महायुतील राष्ट्रवादीकडून (अजित पवार) अर्चनाताई पाटील; परंपरागत प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने

काटी/उमाजी  गायकवाड
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेच्या ऐन निवडणूकीच्या धामधुमीत तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी गुरुवार दि. 4 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित  पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी महायुतील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेशानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

महायुतीत उस्मानाबाद (धाराशिव) ची जागा भाजप, शिवसेना  शिंदे गट की राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार या संदर्भात महायुतीच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स होता. तिन्ही पक्षातील मातब्बरांची नावे चर्चेत होती. दररोज एकेका इच्छुक उमेदवारांच्या नावाची चर्चा रंगत होती.परंतु अखेर महायुतीची ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली असून अजित पवार गटातून भाजपच्या अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या नावावर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने हा सस्पेन्स संपला आहे. अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा धाराशिव लोकसभा निवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी आमनेसामने आले आहेत. यावेळी महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच उतरविण्यात आले आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे तुल्यबळ उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा विजयाचा चौकार लगावणार की अर्चनाताई पाटील या त्यांचा विजयाचा रथ रोखणार ही तुल्यबळ लढत कशी होणार याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. त्यावेळी या अविस्मरणीय  झालेल्या लढतीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी राणाजगजितसिंह पाटील 1,27,566 मतांनी पराभव केला होता. 2024 मध्ये पुन्हा भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करुन लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील या लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्या असून आपल्या पतीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्या निश्चितच प्रयत्न करणार असे दिसत आहे.

आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे नात्याने चुलत बंधू असून मागच्या  2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन भावांमध्ये लढत झाली होती. यंदा 2024 च्या  निवडणुकीत  मात्र दीर-भावजय मधील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. 

महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील 

कोण आहेत राष्ट्रवादी अजित  पवार गटाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील?
अर्चनाताई पाटील या भाजपचे तुळजापूर  विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई आहेत. त्यांनी 2012 साली राजकारणात प्रवेश करीत धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेत निवडून आल्या. त्यानंतर 2017 साली धाराशीव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटातून त्या भरघोस  मताधिक्याने विजयी होत त्यांनी याच काळात धाराशिव जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपदावर काम पाहिले. या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक उपकेंद्राचे जिल्हाभरात जाळे निर्माण केले होते. विविध सामाजिक उपक्रम घेत त्या नेहमी लोकांच्या संपर्कात असतात.

महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव ठाकरे गटातील धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 

कोण आहेत ओमराजे निंबाळकर?
बेधडक स्वभाव व शिवसेनेचं तरुण व नेहमी चर्चेत व सर्वांच्या संपर्कात राहणारे नेतृत्त्व म्हणून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेकडे पाहिले जाते.
ओमराजे निंबाळकर यांचा जन्म 17 जुलै 1982 रोजी झाला. पवनराजे आणि आनंदीदेवी निंबाळकर हे त्यांचे आईवडील  होते. ओमराजे निंबाळकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण धाराशिवमध्येच झाले. पुढील शिक्षणासाठी ते लातूरला व त्यानंतर अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. मात्र, त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा हत्या झाल्यानंतर ते पुन्हा धाराशिवला परतले होते. ओमराजे निंबाळकर यांना सुरवातीच्या  काळात राजकीय क्षेत्रात येण्याची आवड नव्हती.परंतू  2006 साली त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर वयाच्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत गावोगावी  सभा घेऊन आपल्या कर्तृत्वावर जिल्हा  परिषदेत आपले उमेदवार निवडून आणून वयाच्या 23 वर्षी जिल्हा परिषदेत सत्तापालट केली. त्यानंतर डॉ.पाटील यांचा तेरणा साखर कारखानासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉ. पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला ओमराजे  निंबाळकर यांनी सुरुंग लावला होता.

2009 मध्ये राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओमराजें  निंबाळकर यांनी विजय मिळवला तर 2014 च्या  विधानसभेच्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमराजे  निंबाळकर यांचा पराभव करुन वचपा काढला होता. त्यानंतर  2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिस्पर्धी  राणाजगजितसिंह पाटील यांचा तब्बल 1,27,566 मताधिक्य मिळवून या पराभवाची परतफेड केली होती. यंदा 2024 ला पुन्हा लोकसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या परंपरागत प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने  उभ्या आहेत.  या तुल्यबळ लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

उस्मानाबाद (धाराशिव ) या लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, परांडा, धाराशिव व तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून या लोकसभा मतदारसंघात 20 लाख, 8 हजार 92 मतदार आहेत. त्यापैकी 9 लाख 46 हजार 54 मतदार महिला आहेत तर 10 लाख 58 हजार पुरुष मतदार आहेत. या लोकसभा मतदारसंघात 1991 ला विमलताई  मुंदडा, 2004 ला कल्पना नरहिरे व 2024 च्या  निवडणुकीत अर्चनाताई पाटील यांच्या रुपाने महिला उमेदवाराला संंधी  मिळाली आहे. महिला मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात यावरच निवडणूकीचा निकाल अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर 
विविध पक्ष आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीचे उमेदवार हे या लोकसभेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहेच पण या लोकसभा निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक तरूण मतदारांना नव्याने मतदान करण्याची मिळालेली संधी. तरूण मतदार नोंदणी व्हावी आणि त्याचबरोबर मतदार जागृतीसाठी अनेक हालचाली गेल्या काही दिवसात शासनाकडून प्रभावीपणे राबविण्यात  आल्या आहेत.
त्यामुळे या निवडणुकीत  तरुण मतदार कोणाकडे झुकणार यावरही बरीचशी गणिते अवलंबून असणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात फुले, शाहू,आंबेडकरी विचारधारेवर निवडणूक आख्याड्यात रंग भरले जातात. यंदाच्या निवडणुकीतही दलित मतांचा कौल कोणाकडे झुकणार हे पाहाणे सुध्दा महत्वाचे ठरणार आहे. अनेक तरुण कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात सहभागी होणार असले तरी या निवडणुकीत तरुणांमध्ये गेल्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये तर यंदा त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे व त्यांचे पती राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्येच राहिल्यान साहजिकच सध्या अनेक तरूण कार्यकर्त्यांच्या मनात "कोणाता झेंडा घेऊ हाती" 

अशी संभ्रमावस्था निर्माण होताना दिसत आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे उभं राहायचं की भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या अर्चनाताई पाटील यांच्या पाठीमागे उभं राहायचं असं मानसिक द्वंद्व  मतदारांच्या मनात सुरू आहे.

एखाद्या पक्षाशी बांधिलकी जपायची  की व्यक्ती म्हणून उमेदवाराची निवड करायची जर व्यक्ती म्हणून निवड करायची तर मग पक्षीय राजकारणाची भिंत आडवी येणार अशा एकंदरीत धाराशिव लोकसभा निवडणुकीतील राजकीय वातावरणामुळे परिवर्तनाची जबरदस्त एनर्जी असलेल्या तरूणाईच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत असून ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ 

अशीच अवस्था सामान्य सजग मतदाराची झाल्याचे चित्र दिसत आहे. आपले मौल्यवान मत कोणाच्या  पारड्यात टाकावे ही संभ्रमावस्था तरुण मतदारासह सर्वसामान्य सजग मतदारांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. परीक्षेतल्या विषयांचं चिंतन आणि निवडणुकीतल्या विचारांचं मंथन अशी दुहेरी भूमिका ही तरूणाईसह सर्वसामान्य मतदारांना या निवडणुकीत पार पाडावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments