मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त बसव प्रतिष्ठाणच्या अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने रविवार ( ता. २३) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ व्यक्तींचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संघटनेच्या वतीने ९ वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. कोरोना काळात पहिल्या लॉक डाउनमध्ये किराणा किट वाटप, कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण व दुसऱ्या लॉक डाउनमध्ये कोविड केअर सेंटर मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा करून तेथील रुग्णांना अन्नदान व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले होते.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना नागपूरचे एम्सचे अध्यक्ष तथा माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे बोलताना म्हणाले की, पुरस्कर्त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करावा. १२ व्या शतकात समता नायक महात्मा बसवेश्वरानी समतेचा संदेश देत समाजाच्या हितासाठी अनुभव मंटपाची स्थापना करून त्या अनुभव मंटपात विविध जाती-धर्मातील व्यक्तींना सोबत घेऊन समाजहिताचे कार्य त्यांच्या हातून घडले. त्यामुळे त्यांना लोकशाहीचे आद्यजनक ही म्हंटले केले, असे प्रतिपादन डॉ. महात्मे यांनी केले. पुढे बोलताना सद्याची परिस्थिती पाहता समाजाच्या हितासाठी झटणारी चळवळ शमवत चाललेली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून महापुरुषांचे विचार समाजात पेरणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. एमसीआयएमचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, लातूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील होते. यावेळी भाजपा ओबीसी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उज्वलाताई हाके, उमरगा विधिज्ञ मंडळ अध्यक्ष अँड. जी. के. गायकवाड, पंचायत समिती माजी सभापती सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, धनगर समाज संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष अनंत बनसोडे, लातूर जिल्हा अध्यक्ष अनिल पुजारी, सातलींग स्वामी, बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची प्रमूख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रगीत, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार तर दोन व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यातून पुरस्कार प्राप्त व्यक्ती नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप गव्हाणे,सिद्धलिंग हिरेमठ, विरेश गुंडगोळे, अमित ढाले, कल्याणी येवले, महिंद्र कांबळे, अभय भालेराव, सुरेश बेडजुर्गे, महेश लोणी, मल्लिनाथ सगरे, संकेत इंगोले, नीरज राजपूत,शिवा पुराणे,संजय शेळके, शेखर माळी, सुनील पुराणे,उमेश इकळगे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार मयुरी चौधरी यांनी मानले.
राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार मानकऱ्यांमध्ये गोबारे अजित (उमरगा-शिक्षण क्षेत्र), सुधीर कांबळे (होळी-शिक्षण), भैरवनाथ कानडे (नळदुर्ग-शिक्षण), डॉ. सत्यजित डुकरे (मुरूम-वैद्यकीय), प्रभाकर साळुंके (उमरगा-वैद्यकीय), ॲड. बाबुराव माळी (पेठसांगवी-वकील), ॲड. अरुण हेडे (उमरगा-वकील), डॉ. विक्रांत राठोर (धाराशिव- व्यसनमुक्ती), सुधीर कोरे (जेवळी-पत्रकार), नरसिंग घोणे (लातूर-पत्रकार), आशुतोष पाटील (पुणे-युवा अभिनेता-कोरिओग्राफर), अनिरुद्ध सातपुते (कोल्हापूर-नृत्य-कोरिओग्राफर), सोनाली पवार (गणेश नगर तांडा-क्रीडा), श्रीमंत भुरे (केसरजवळगा-सामाजिक/प्रगतशील शेतकरी), गिरीश मिनियार (मुरूम-सामाजिक),
वाहिदअल्ली शेख (मुरूम-जनसेवा), राजेंद्र गुरव (मुरूम-शिक्षण), उमाकांत देशपांडे (मुरूम-प्रशासकीय), काशिबाई राजपूत (केसरजवळगा-शिक्षण) तर गणेश गुळवे (अहमदपूर-जीवनगौरव), डॉ. राधाकिसन डागा (मुरूम-जीवनगौरव) आदी.
मानव हाच धर्म समजून बसव प्रतिष्ठानचे कार्य
--डॉ. रामलिंग पुराणे
सामाजिक कार्यातील थंडावलेल्या चळवळीला प्रेरणा मिळावी आणि त्या प्रेरणेतून समाजहित, राष्ट्रहितासाठी कार्य घडावे यासाठी बसव प्रतिष्ठाणच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. महात्मा बसवेश्वर यांच्या तत्वानुसार मानवता हाच धर्म. या भूमिकेतून प्रतिष्ठाण काम करते.
-----डॉ. रामलिंग पुराणे अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण
0 Comments