काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.1 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता महाराष्ट्रात 1 जुलैपासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या निर्देशानुसार नवीन फौजदारी कायदे लागू होणार असून त्याअनुषंगाने तामलवाडी पोलीस ठाण्यात तामलवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 27 गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, पत्रकार यांची संयुक्तपणे बैठक बोलावून नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सपोनि शैलेश पवार यांनी मार्गदर्शन करताना भारतातील प्रमुख तीन फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगून ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहिता 1860 च्या जागी भारतीय न्याय संहिता 2023, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ऐवजी भारतीय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, व भारतीय पुरावा कायदा 1872 ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 या प्रमाणे कायद्यात बदल करण्यात आला असल्याचे सांगून या तीनही कायद्यांना भारत सरकारने 1 जुलै रोजी अधिसूचना जारी करुन मंजुरी दिली असल्याचे सांगत हे कायदे अंमलात आले असल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी या कायद्याविषयी गावागावात लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे म्हणाले की, नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस दलाने प्रशिक्षण घेतले असल्याचे सांगून जुने दावे पहिल्या कलमाद्वारे चालणार असून येथून पुढे चालणारे दावे नवीन कायद्याद्वारे चालणार असल्याचे सांगत एक वर्षात निकाल द्यावा लागणार असल्याचे सांगितले.नव्या कायद्यांचा उद्देश गुन्हेगाराला शिक्षा देणे नसून न्याय देणे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी नवीन कायद्याविषयी उपस्थितांची मतेही विचारात घेण्यात आली.
तंटामुक्त मुक्त समिती अध्यक्षांना विश्वासात घ्यावे
-- तंटामुक्त समिती अध्यक्ष दिगंबर खराडे मसला (खुर्द)
यावेळी मसला (खुर्द) येथील तंटामुक्त मुक्त समितीचे अध्यक्ष दिगंबर खराडे यांनी गावातील तक्रारींमध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत व्यक्त करून यापुढे तंटामुक्त मुक्त समितीच्या अध्यक्षांना विश्वासात घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी तंटामुक्त मुक्त समिती अध्यक्षांना विश्वासात घेऊन काम केले जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या 27 गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments